भाजप शहर अध्यक्षपदी आशीष शेलार यांची फेरनिवड

शिवसेनेबरोबर युती करायची की नाही, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला सत्तेपासून कोणीही रोखू शकत नाही, अशी गर्जना करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई आमचीच’ असा अप्रत्यक्ष इशारा बुधवारी शिवसेनेला दिला. मुंबईच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ तयार असून शहराचा चेहरामोहरा २०१९पर्यंत माझे सरकारच पालटणार, अशी सूचक ग्वाहीही त्यांनी दिली.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. या मेळाव्यात भाजपच्या शहर अध्यक्षपदी अ‍ॅड. आशीष शेलार यांची २०१८पर्यंत फेरनिवड करण्यात आली. त्यानंतर शेलार यांनीही शिवसेनेचे नाव न घेता त्यांची संभावना ‘मायावी राक्षस’अशी केली. देशातील बहुसंख्य पक्ष हे घराण्याशी किंवा व्यक्तीशी निगडित असून भाजप हा विचारांवर चालणारा एकमेव पक्ष असल्याचे सूचक विधानही फडणवीस यांनी केले. युतीत सध्या सुरू असलेली खणाखणी आणि राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे नाव घेणे या दोघा नेत्यांनी टाळले असले तरी त्यांचा सारा रोख शिवसेनेवरच होता.

शेलार यांनी कथारूपाने शिवसेनेवर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली. ‘मायावी राक्षसा’वर वार केले तर त्याची ताकद वाढून तो मोठा होतो, पण त्याला डिवचून आपल्यावर वार करण्यासाठी त्याला उद्युक्त केले, तर त्याची ताकद कमी होऊन तो लहान होतो आणि त्याला बाटलीत बंद करता येते, अशी कथा सांगून अ‍ॅड. शेलार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना श्रीकृष्णाची उपमा दिली. विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेली लढाईची नीती आता आपण सत्तेत असल्याने बदलावी लागणार असून ‘श्रीकृष्णनीती’नुसार राक्षसाला बाटलीत बंद करू, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला. आपल्यावर चिखलफेक करणारा शत्रू असेल असे नाही आणि मदतीसाठी येणारा मित्रच असेल असेही नाही, असे सूचक उद्गारही शेलार यांनी काढले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रखडलेले प्रकल्प २० महिन्यांत मार्गी लावण्यासाठी कोणती पावले टाकली, याचे सविस्तर विवेचन केले. हनुमंतालाही शक्तीची जाणीव करून दिल्यावर त्याने समुद्र ओलांडून लंकेत आग लावली, याचा दाखला देत आम्हाला सामान्यांसाठी सत्तापरिवर्तन हवे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ‘युती होणार की नाही’, या चर्चेत न अडकता विजय मिळविण्यासाठी कामाला लागावे, असे आवाहन केले.

मुख्यमंत्री म्हणाले..

  • शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे भूमिपूजन ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार
  • विमानतळ परिसरातील झोपडपट्टीवासीयांचे त्याच जागी पुनर्वसन
  • १५२ किमीचे मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी वर्षअखेरीपर्यंत निविदा
  • एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडॉरबरोबर सहा पदरी मार्गही उभारणार
  • मुंबईत सर्वसामान्यांना १५-२० लाख रुपयांत मालकी घरे
  • सागरी किनारपट्टी रस्ताही (कोस्टल रोड) उभारणार
  • धारावीत पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावून प्रत्येकाला घर देणार