शिवाजी पार्कवर एकत्र जाणे मात्र टाळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी महापौर बंगल्यात भेट झाली. मात्र शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर हे दोन नेते एकत्र गेले नाहीत. त्यावरून भाजप व शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनाप्रमुख ठाकरे यांचा शनिवारी स्मृतिदिन होता. शिवसेनेचे अनेक नेते, कार्यकर्ते यांनी शिवाजी पार्कवरील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्रीही ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कवर गेले. मात्र त्यांनी आधी जवळच असलेल्या महापौर बंगल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ही भेट साधारणत: १५ मिनिटांची होती. त्या वेळी या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे समजू शकले नाही. मात्र नंतर मुख्यमंत्री एकटेच शिवाजी पार्कवर गेले आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले.

उद्घव ठाकरे यांनी सार्वजनिकरीत्या मुख्यमंत्र्यांबरोबर जाणे टाळले. त्यावरून भाजप व शिवसेना यांच्यातील राजकीय तणाव वाढत असल्याची चर्चा आहे. शिवाजी पार्कवर  शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.