महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. या भ्रष्टाचारामुळे जनता पुरती होरपळून निघत असताना मंत्रीलोक आपल्या नातेवाईकांच्या लग्नावर करोडो रुपयांची उधळपट्टी करत आहेत. एकेका मंत्र्याने जमलेली ‘माया’ डोळे पांढरे करणारी आहे. या भ्रष्ट सरकारला सळो की पळो करून सत्तेतून हद्दपार करण्याचा संकल्प गुढीपाडव्याला महाराष्ट्र प्रदेश भाजपचे नवे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सोडला. दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणारे बेताल वक्तव्य करणाऱ्या अजित पवार यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करेपर्यंत विरोधी पक्ष आंदोलन करेल असेही फडणवीस यांनी जाहीर केले.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये आघाडी सरकारने राज्यावर दोन लाख ७१ हजार कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. सिंचनावर सत्तर हजार कोटी रुपये खर्च होऊनही एक टक्का जमीनही सरकारला सिंचनाखाली आणता आलेली नाही. जनतेचा पैसा ओरपण्याचेच काम आघाडी सरकारमधील मंत्री करत आहेत. अन्न, वस्त्र, निवारा आणि पाणी या जनतेच्या प्राथमिक गरजाही जे सरकार पुरे करू शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, असे  ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादी चले जाव’ हाच महाराष्ट्राच्या हितासाठी माझा एकमेव अजेंडा राहील असेही फडणवीस म्हणाले. अजित पवार यांच्या वक्तव्यावर शरद पवार गप्प का असा सवाल करून, दुष्काळग्रस्तांची थट्टा उडविणाऱ्या अजित पवारांची माफी आम्हाला नको तर राजीनामा हवा आहे असेही त्यांनी सांगितले.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरांच्या वेगळ्या समस्या आहेत. या ठिकाणी मराठी माणूस ताठ मानेने उभा राहिला पाहिजे. अनधिकृत बांधकामे  ही लोकांना मृत्यूच्या दाढेत ढकलणारी असल्यामुळे ती खणून काढली पाहिजे असे माझे मत आहे. मुंबई व ठाण्यात शिवसेना-भाजपची सत्ता असल्यामुळे सर्वशक्तीनिशी अतिक्रमणे रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही ते म्हणाले.