चामडा बाजार, धारावी

भूलभुलैय्याशीच तुलना करता येईल अशा धारावीच्या छोटय़ा-छोटय़ा गल्ल्यांमध्ये आज लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबंच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात. यातलाच एक म्हणजे चामडा बाजार.

मध्य रेल्वेच्या शीव स्थानकापासून उजव्या दिशेला साधारण एक किलोमीटर अंतरावर आशियातील सर्वात मोठय़ा झोपडपट्टीला सुरुवात होते. स्थानकाच्या एक क्रमांकाच्या फलाटापासून उजव्या हाताने दगडी पुलाच्या चिंचोळ्या बोगद्यातून पुढे गेल्यानंतर पहिल्यांदा मासळी बाजार लागतो. पुढे गेल्यावर चामडय़ाचे कमरेचे पट्टे, बॅगा, जॅकेट्स, वॉलेट्स यांची छोटय़ामोठय़ा दुकानांची दुतर्फा रांग नजरेला पडते. थोडं पुढे गेल्यावर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला अनेक गल्ल्या दिसतात. या गल्ल्या म्हणजे भूलभुलैय्याच! एका गल्लीत शिरलात की पुन्हा त्याच गल्लीतून बाहेर पडाल याची शाश्वती नाही. गल्लीच्या दुतर्फा दोन-तीन मजल्यांची घरे दिसतात. प्रत्येक घरासमोर एक लोखंडी शिडी. चढताना पडू नये म्हणून आधाराला लटकणारी दोरी हमखास दिसते. प्रत्येक घरासमोर छोटे-छोटे नाले. कुठे तर नाला तुंबल्यामुळे पाणी साचून राहिलेले असते. त्यावर शेकडो माशा आणि डास घोंगावत असतात. अशा या धारावीच्या गल्ल्यांमध्ये लाखो कुटुंबं वस्ती करून आहेत. केवळ कुटुंबेच नव्हे तर त्यांचे छोटेमोठे व्यवसाय, कारखानेही याच गल्ल्यांमध्ये बिनधोक सुरू असतात.

धारावीच्या उद्यमशीलतेला मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात, म्हणजे १८८२ साली विविध वस्तूंच्या उत्पादनांच्या निमित्ताने धारावी वसू लागली. ग्रामीण भागातून रोजगाराच्या शोधासाठी आलेल्या स्थलांतरितांनीच ती वसवली. मोकळी जागा मिळेल तिथे घरे बांधली गेली. गरजेप्रमाणे वाढविली गेली. अशी ही धारावी आज सुमारे सात लाख चौरस फुटापर्यंत पसरली आहे. येथे मराठी, हिंदी, दाक्षिणात्य, बंगाली, गुजराती, राजस्थानी, मुस्लीम अशा विविध जाती-धर्माचे लोक पाहावयास मिळतात. धारावीतील कारखान्यांमध्ये काम करणारे बहुतांश कारागीरही स्थलांतरित आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, बंगाल, दिल्ली या भागातून पैसे कमविण्यासाठी हे लोक धारावीत येतात. धारावीच्या एकेका गल्लीत किमान दहा कारखाने वसले आहेत. तेथे सतराशे साठ वस्तूंचे उत्पादन आणि विक्री होते. त्यापैकी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे चामडय़ाची.

देवनार कत्तलखान्याबरोबरच मुंबईभरातून आलेल्या बकऱ्या, मेंढय़ा, बैल आणि म्हशी यांच्यापासून कातडे कमावण्याचा मोठा व्यवसाय इथे चालतो. याला ‘चामडा बाजार’ म्हणतात. कातडय़ापासून पुढे बॅगा, पट्टे, जॅकेट्स तयार करण्याचा व्यवयास पुन्हा इथल्याच चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये वसला आहे. पशूंच्या कातडीचा उग्र दर्प नाकात घुसू लागला की चामडा बाजार आल्याचे आपोआप कळते. अशा वातावरणात सामान्य माणूस फार काळ राहू शकत नाही. परंतु येथील कामगार हा उग्र वास सहन करत कारखान्यांमध्ये तासनतास काम करीत असतात. नव्हे इथेच ते राहतात. त्यांचे जेवणखाण, झोप येथेच असते. धारावीतील प्रत्येक कारखान्यात हीच परिस्थिती आहे.

एका लहानशा खोलीत पशूंचे चामडे जाड मीठ लावून ठेवले जाते. बकरी आणि मेंढय़ाचे चामडे ५० ते ८० रुपयांपर्यंत खरेदी केले जाते. तर म्हैस किंवा बैल यांचे चामडे दीड ते दोन हजारापर्यंत खरेदी केले जाते. चामडे खराब होऊ नये यासाठी २४ तासांच्या आत त्यावर मीठ चोळतात. हे मीठ वापरातले नसते. मीठ लावल्यानंतर चामडे सात ते आठ फूट उंचीच्या रोलरमध्ये पाणी आणि काळ्या रंगाच्या पावडरचे रसायन टाकून धुतले जाते. १५ ते १७ तास हे चामडे धुतले जाते.  तितका वेळ हे यंत्र सुरू असते. धुतलेले चामडे एकावर एक रचून ठेवतात. पाणी गळून गेल्यावर ते मऊ होण्याकरिता मोठय़ा यंत्राच्या साहाय्याने त्यावर इस्त्री फिरवली जाते. त्यानंतरही चामडे कडक वाटले तर कारखान्याबाहेरील दगडावर आपटून ते मऊ केले जाते. पुन्हा त्यावर इस्त्री फिरवून काही वेळ वाळवून हे चामडे रंगकाम करण्यासाठी पाठविले जाते.

ही एक वेगळीच खोली असते. खोलीभर दोरी बांधलेल्या असतात. चामडय़ावर रंगकाम करून वाळवण्यासाठी ते येथे टांगले जाते. त्यानंतर चामडे बॅगा, बेल्ट, शूज बनविणाऱ्या कारखान्यात पाठविले जाते. हा तयार माल शीव स्थानकाजवळील दुकानांमध्ये विक्रीकरिता येतो. महिलांसाठीच्या चामडय़ाच्या बॅगेची किंमत येथे २ हजारांपासून सुरू होते. तर चामडय़ाचे जॅकेट्स ३ हजारापासून पुढे १० हजारापर्यंत विकली जातात. यापुढे वांद्रे, अंधेरी, बोरिवली, मुलुंडच्या बडय़ा दुकांनांमधून ती कोणत्याही किमतीला विकली जाऊ शकतात. त्याशिवाय छोटय़ा पर्सेस आणि प्रवासाकरिता लागणाऱ्या मोठय़ा बॅगा ही देखील या बाजाराची खासियत. इथे बनलेल्या चामडय़ाच्या वस्तू गेली कित्येक वर्षे अनेक नामांकित ब्रँडने विकल्या जात आहेत. अशा या चामडा बाजाराला विविध देशी-परदेशींनी बनविलेल्या चित्रपट, लघुपटांमुळे प्रसिद्धी दिली. कारण धारावीकरांच्या आयुष्याबद्दल भारतीयांनाच नव्हे तर परदेशी पर्यटकांनाही आकर्षण असते. आज धारावी एका वेगळ्या प्रकारच्या पर्यटनाचा आनंद लुटू पाहणाऱ्या पर्यटकांकरिता ‘पिकनिक स्पॉट’ बनली आहे. कातडय़ांच्या या बाजारात अशी ‘गोरी’ कातडी फिरताना अनेकदा दिसते. पण धारावीच्या चामडा बाजाराला त्याचे अप्रूप राहिलेले नाही.

गोवंश हत्याबंदीचा रोजगारावर परिणाम

‘लेदर गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार धारावीत कातडी वस्तू उत्पादनाचे १५ हजार लघुउद्योग आहेत. येथे चामडय़ाच्या बाजारात काम करणाऱ्या कामगारांना महिन्याला ८ ते १० हजार इतका रोजगार मिळतो. मात्र गोवंश हत्याबंदीच्या कायद्यानंतर देवनार कत्तलखान्यातून येणाऱ्या कातडीच्या प्रमाणात घट झाल्यामुळे येथील कामगारांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.

अस्सल ‘लेदर’ कसे ओळखाल?

लेदरच्या नावाने विकल्या जाणाऱ्या बॅगा किंवा वस्तू या नेहमीच चामडय़ापासून बनलेल्या असतीलच असे नाही. बऱ्याचदा चामडय़ासारख्या दिसणाऱ्या बॅग फोम कापडापासून तयार केल्या जातात. मात्र चांगल्या दर्जाच्या लेदरला पशूंच्या कातडीचा उग्र वास येतो. तर लेदरला जाळले असता ते जळत नाही. या दोन पद्धतीतून खऱ्या लेदरची शहानिशा केली जाते. तर बकरी आणि मेंढीची कातडी पातळ असल्याने यांपासून तयार केलेल्या वस्तू पातळ असतात. तर म्हैस किंवा बैलांची कातडी जाड असल्याने हे लेदर टिकाऊ असते. त्यामुळे हे कातडे महागही असते.