संदीप आचार्य

देशभरात करोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्यांचे प्रमाण मोठे असून करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मधुमेह व उच्च रक्तदाब, मूत्रपिंडविकार व हृदयविकाराच्या रुग्णांनी आपल्या जीवनशैलीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे, असा सल्ला लीलावती रुग्णालयातील विख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी दिला आहे.

या रुग्णांच्या शरीरात प्रतिकारशक्ती कमी असल्याने करोनाचा विचार करून या रुग्णांनी आहार- विहार व पथ्यपाण्याची विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

प्रामुख्याने मधुमेहाच्या रुग्णांची तीन महिन्यांतील सरासरी साखर ही सातच्या खाली असली पाहिजे. या रुग्णांनी कमी खाणे, वेळच्या वेळी खाणे व सावकाश खाणे गरजेचे आहे. सावकाश खाण्याला अत्यंत महत्त्व आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते व साखरेत कमी रूपांतर होते.

तणावामुळेही शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते हे लक्षात घेऊन आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संगीत ऐका व अन्य कशातही स्वत:ला गुंतवून ठेवा आणि ताणतणावावर मात करण्याचा प्रयत्न करा. हृदयविकारासह वरील सर्वच रुग्णांनी वेळच्या वेळी औषध घेणे तसेच कोणताही त्रास वाटल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. सध्या बरेच सुशिक्षित नेट वा व्हॉट्सअ‍ॅपवर जास्त अवलंबून असतात. व्हॉट्सअ‍ॅप हे अफवा पसरवण्याचेच काम जास्त करत असल्याने ते टाळणे सर्वात महत्त्वाचे असल्याचेही डॉ. जोशी यांनी आवर्जून सांगितले.

ही काळजी घ्यावी..

घरातल्या घरात किमान एक हजार पावले रोज चालले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच रुग्णांनी माफक व वेळच्या वेळी खाणे, किमान सात ते आठ तासाची झोप घेणे गरजेचे आहे. करोनाच्या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेला विशेष प्राधान्य देऊन दिवसातून किमान दोन वेळा आंघोळ करणे, वेळोवेळी हातपाय स्वच्छ धुणे व शौचालय कायम स्वच्छ राखणे गरजेचे आहे. करोनाचा विषाणू हा केवळ खोकला व शिंक यातूनच नव्हे तर शौचालयाच्या माध्यमातूनही पसरू शकतो हे लक्षात घेऊन स्वच्छतेला अग्रक्रम दिला पाहिजे, असे डॉ. जोशी यांनी सांगितले.