राज्यातील करोना बाधित रूग्णांची वाढती संख्या आणि आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन सरकारने आता सेवानिवृत्त सैनिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना हाक दिली आहे. मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी समाज माध्यमाद्वारे संवाद साधताना करोना विरूद्धच्या मोहिमेत सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करण्यासाठी आरोग्य सेवेत काम केलेल्या लोकांनी पुढे यावे असे आवाहन के ले. त्याचप्रमाणे करोना बाधितांवर आता वेगवेगळ्या रूग्णालयांत उपचार करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी दिली.

राज्यात करोनाचा पहिला रुग्ण आढळला त्याला  चार आठवडे पुर्ण झाले असून टाळेबंदीमुळे लोकांची गैरसोय होत आहे हे खरे असले तरी करोना रोखण्यासाठी सामाजिक अंतराशिवाय दुसरे हत्यार  नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, विविध उपाययोजना आणि दक्षता घेऊनही राज्यातील करोना बाधितांची संख्या वाढत आहे.  आता ही वाढ केवळ रोखायचीच असे नाही तर रुग्णाचा वाढता आलेख शुन्यावर आणायचा आहे. त्यामुळे लोकांनी घरीच रहावे असे आवाहनही त्यांनी के ले.

करोना युद्धात सहभागी होऊन शासनाच्या बरोबरीने काम करू इच्छिणाऱ्य़ा आणि आरोग्य सेवेत काम केलेल्या निवृत्त सैनिक, निवृत्त परिचारिका, वॉर्डबॉय, आरोग्य सेवेत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्वांनी पुढे येऊन आपले नाव, पत्ता  covidyoddha@gmail.com  या ई मेल वर नोंदवावे  असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी के ले. सर्दी, पडसे आणि तापाचे लक्षणे असलेल्या रुग्णांची  तपासणी करून त्यांना त्यांच्या लक्षणाप्रमाणे पुढील उपचारासाठी स्वतंत्र रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.  सौम्य लक्षणे, तीव लक्ष्णे आणि तीव्र लक्षणांबरोबर इतर तक्रारी आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयांची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तीव्र लक्षणे, गंभीर आजार व इतर तक्रारी असणाऱ्या रुग्णांना तिसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात  येत असून ही रुग्णालये  ह्दयविकार, किडणी, मधुमेह यासारख्या सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी सुसज्ज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा योजनेत केवळ तांदुळ मिळत आहे, त्याचे वाटप सुरू करण्यात आले असून या योजनेचा  केशरी कार्डधारकांना लाभ होत नाही. त्यामुळे किमान आधारभूत किंमतीवर मध्यमवर्गीयांना धान्य उपलब्ध करून देण्याची मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.

मुंबईसाठी विशेष अर्थसहाय्याची शिवसेनेची मागणी

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या शहरात त्यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. त्याचबरोबर टाळेबंदी उठवण्याची घाई नको अशी भूमिकाही शिवसेनेने मांडली.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यात शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी सहभाग घेतला. मुंबई हे अवाढव्य शहर आहे. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राचा आकारही मोठा आहे. अशा ठिकाणी करोना नियंत्रण करण्यासाठी केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.