दिघी बंदराचा विकास करण्यासाठी आणखी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. यातून बंदरातील पुढचे धक्के बांधण्याचे काम होणार आहे.
राज्य सरकारने ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ तत्त्वावर रायगड जिल्ह्य़ातील दिघी येथे खासगी क्षेत्राच्या सहकार्याने बंदर प्रकल्प राबविण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम ‘दिघी पोर्ट’ या कंपनीला मिळाले आहे. बंदरावरील पाचपैकी दोन धक्के बांधण्याचे काम यापूर्वीच झाले आहे. तेथे मालवाहतूकही सुरू झाली आहे.
आतापर्यंत दिघी बंदराच्या कामावर १५०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. आणखी तीन धक्के बांधण्याचे काम डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी
आणखी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचे ‘दिघी पोर्ट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय कलंत्री यांनी सांगितले.
सध्या या बंदराची क्षमता दहा लाख मेट्रिक टन आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ती क्षमता ३० लाख मेट्रिक टन इतकी होणार आहे.