सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे गुरुवारी सरकारची कोंडी झाली. दिलीप कांबळे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत मंत्रीच जर असे बोलू लागले, तर आम्ही प्रश्न विचारायचे कसे, असा मुद्दा सभापतीपुढे उपस्थित केला. या विषयावरून दोनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृह नेते एकनाथ खडसे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडीत यांनी गेवराई तालुक्यातील शिष्यवृत्ती वाटपातील गैरव्यवहारावर प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना दिलीप कांबळे यांनी अमरसिंह पंडीत यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून सर्वच विरोधक एकत्र जमून घोषणाबाजी करू लागले. त्यामुळे कामकाज काहीवेळासाठी तहकूब करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंत्र्यांचे वक्तव्य उचित नसल्याचे मत मांडले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलीप कांबळे यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी मागणी केली. पण त्याचवेळी विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी दिलीप कांबळे यांचे वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. सभागृहात मंत्र्यांनीच असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. दिलीप कांबळे हे मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागून उपयोग नाही. सभागृहाचे नेते एकनाथ खडसे यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी देशमुख यांनी केली. त्यावरून पुन्हा एकदा सभागृहात घोषणाबाजी झाली. विरोधकांनीही खडसे माफी मागत नाही, तोपर्यंत कामकाज चालू न देण्याचा पवित्रा घेतल्यामुळे सभापतींनी पुन्हा एकदा सभागृहाचे कामकाज चार वाजेपर्यंत तहकूब केले. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर खडसे यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच आक्षेपार्ह वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्यात आले.