मुंबई : राज्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ५० पेक्षा कमी सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांना करोना संदर्भातील नियमांचे पालन करीत सभासदांच्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यास सहकार विभागाने शुक्रवारी परवानगी दिली आहे. यापूर्वी अशा सभा के वळ  दूरचित्र संवादाच्या माध्यमातून घेण्यास परवानगी  होती.

५० पेक्षा जास्त सभासद संख्या असलेल्या सर्व सहकारी संस्थांना मात्र दूरचित्र संवादाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घ्याव्या लागणार आहेत.  या सभांसाठी संस्थेच्या प्रत्येक सभासदास वार्षिक सर्वसाधारण सभेचा दिनांक, वेळ, ठिकाण व ऑनलाईन लिंक याबाबतची माहिती किमान सात दिवस अगोदर एसएमएस,मेल, व्हॉटस् अ‍ॅपद्वारे कळविण्यात यावी. वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस संस्थेच्या सूचना फलकावर, संस्थेच्या शाखांची कार्यालये या ठिकाणी लावण्यात यावी.  ज्या सभासदांचे ईमेल, पत्ता किंवा संपर्कासाठी  दूरध्वनी क्रमांक नसेल अशा सभासदांना बैठकीत चर्चेसाठी असणाऱ्या विषयाबाबतची माहिती सात दिवसांत पत्राद्वारे कळवावी. सर्व सहकारी संस्थांनी त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबतच्या माहितीची जाहिरात संस्थेचे कार्यक्षेत्र विचारात घेवून, किमान एक स्थानिक वर्तमानपत्र, एक जिल्हा वर्तमानपत्र किंवा राज्य दर्जा असलेल्या मराठी किंवा इंग्रजी वर्तमानपत्रात देण्याच्या सूचना सहकार विभागाने दिल्या आहेत.