शीव येथील लो. टिळक रुग्णालयात प्रयोग; रुग्ण आणि नातेवाईकांची शोधाशोध थांबणार

मुंबई : पालिका रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईकांची पायपीट थांबविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सामाजिक संस्थेच्या मदतीने दिशादर्शक अ‍ॅप लवकरच सुरू होणार आहे.

पालिका रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसह उपचारापासून विविध तपासण्या करण्यासाठी तासन्तास फिरत राहतात. रुग्णालयामधील वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक इमारतींमध्ये हे विभाग शोधताना पायपीट करून रुग्ण जेरीस येतात. रुग्ण आणि नातेवाईकांची ही भटकंती दूर करण्यासाठी दिशा दाखविणारे अ‍ॅप प्रोजेक्ट मुंबई संस्थेकडून तयार केले जात आहे.

दिशा दाखविणाऱ्या खुणा अ‍ॅपसह प्रत्यक्ष रुग्णालयातही उपलब्ध असल्याने याच्या मदतीने रुग्णांना वेळेत उपचार घेणे शक्य होईल. सध्या हे अ‍ॅप इंग्रजी आणि हिंदूी भाषेमध्ये उपलब्ध असेल. अ‍ॅपची आखणी पूर्ण झाली असून नवीन वर्षांच्या सुरुवातीला हे अ‍ॅप रुग्णांसाठी उपलब्ध असेल, असे या प्रोजेक्ट मुंबई संस्थेतील या प्रकल्पाच्या प्रमुख रुपाली वैद्य यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी अंदाजे सात ते आठ लाख रुपये खर्च येणार असून यासाठी आर्थिक तरतूद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लो. टिळक रुग्णालयात अ‍ॅप पूर्णपणे विकसित झाल्यानंतर केईएम, नायर आणि जे.जे. रुग्णालयासाठीही अशा अ‍ॅपची निर्मिती करण्यात येईल, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी दिली.

रुग्णालयात दररोज जवळपास दोन हजार रुग्ण उपचारासाठी येतात. रुग्णालय आवारात अनेक इमारती असून विविध विभाग वेगवेगळ्या इमारतींमध्ये आहेत. डॉक्टरांना प्रत्येक वेळेस रुग्णांना विभागात कसे जावे, हे सांगणे शक्य नसते.

रुग्णालयात काही ठिकाणी पाटय़ा लावलेल्या असल्या तरी रुग्णांना अनेकदा विभागापर्यंत पोहोचण्यास अडचणी येतात. त्यामुळे हे अ‍ॅप दिशा दाखविण्यासाठी नक्कीच मदत करेल. संस्थेला अ‍ॅपची आखणी करण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती रुग्णालयाने पुरविलेली असल्याची माहिती लो. टिळक रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी दिली.

अ‍ॅप कसे असेल?

ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीत असणाऱ्या या अ‍ॅपमध्ये रुग्णालयातील प्रत्येक विभाग, त्याचे रुग्णालयातील ठिकाण नोंदलेले असेल. रुग्णांच्या सोईसाठी रुग्णालयातील प्रत्येक विभागाला विशिष्ट नंबर आणि रंग देण्यात येईल. रंग आणि नंबरनुसार विभागाची दिशा दाखविणाऱ्या पाटय़ा आणि चिन्हांसह रुग्णालयातही ठिकठिकाणी लावण्यात येतील. अ‍ॅपमध्ये प्रत्येक विभाग नमूद असून त्याकडे पोहोचण्याचा मार्गही दाखविलेला असेल. जसे की स्त्रीरोगप्रसूती बाह्य़रुग्ण विभागाकडे (ओपीडी) जायचे असल्यास अ‍ॅपवरील ओपीडी भागामध्ये गेल्यास इमारतीचे ठिकाण, विभाग असलेला मजला याची दिशा दाखविण्यात येईल.