कोकणासाठी गणपती विशेष रेल्वेगाडय़ा सोडण्यावरुन रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. ११ ऑगस्टला गाडय़ा सोडण्याची तयारी असतानाही तात्पुरती स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून अद्यापही  पत्र आले नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. तीन दिवस झाले त्याची प्रतिक्षा करत असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तर गाडय़ा सोडण्यासाठी पत्र देऊनही रेल्वेने त्या सोडल्या नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी एसटी सोडल्यानंतर राज्य सरकारने विशेष गाडय़ा सोडण्याची परवानगी दिली आणि मध्य रेल्वेला ७ ऑगस्टला पत्र पाठवले. त्यानतंर गाडय़ा चालवण्यासाठी रेल्वे मंडळाकडून ९ ऑगस्टला मंजुरीही मिळाली. मात्र गाडय़ा न चालवण्यासाठी तात्पुरती स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकारच्या संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तोंडी सूचना मध्य आणि पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या. यानंतर १० ऑगस्टला मध्य रेल्वेने राज्य सरकारला पत्र पाठवून तात्पुरती स्थगितीबाबत लिखित स्वरुपात देण्याची मागणीही केली. हे पत्र रेल्वे मंडळ आणि राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या संचालकांनाही पाठवले. परंतु त्यानंतरही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले. रेल्वे मंडळाने मध्य रेल्वेला याविषयी विचारणा केली असून पाठपुरावा करण्यास सांगितले आहे. अन्यथा अंतिम निर्णय घेण्याचा विचार केला जाणार असल्याचे सांगितले. गणोशोत्सव व विलगीकरणाचा कालावधी पाहता या विशेष गाडय़ा आता सुटू शकणार नाहीत. मात्र गणेशोत्सव संपल्यानंतर कोकणातून येणाऱ्यांसाठी तरी गाडय़ांचे नियोजन होऊ शकते.

आम्ही गाडय़ा चालवण्यासाठी रेल्वेला पत्र दिले. त्यांनीच गाडय़ा चालवल्या पाहिजे होत्या. परंतु तसे न करता गेल्या वेळेप्रमाणेच आढेवेढे घेत आहेत. रेल्वेने जर संपर्क साधला असेल तर त्याची माहिती घेऊन दोन दिवसांत स्पष्टीकरण दिले जाईल.

-अनिल परब, परिवहन मंत्री

गणेशोत्सवासाठी कोकणात गाडय़ा सोडण्यासाठी रेल्वे मंडळाकडून मंजुरी कधीच मिळाली आहे. मात्र राज्य सरकारने या गाडय़ा चालवण्यासंदर्भात अंतिम निर्णय दिलेला नाही. त्याची प्रतीक्षा करत आहोत.

-शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे