सिग्नल यंत्रणेत कोणताही बिघाड नाही, रुळालाही कुठेही तडा नाही, पेंटोग्राफ आणि ओव्हरहेड वायर दोन्ही एकदम ठीक आहेत, असे असतानाही मध्य रेल्वेच्या गाडय़ा उशिराने धावतात. यामागे कोणतेही तांत्रिक कारण नसून दिवा येथील रेल्वे फाटक या दिरंगाईला कारणीभूत आहे. हे फाटक उघड-बंद होण्यासाठी लागणारा कालावधी पाच मिनिटांपेक्षा जास्त झाल्यास चारही मार्गावरील गाडय़ा खोळंबतात. मध्य रेल्वेमार्गावरील बहुतांश सर्व रेल्वे फाटके बंद केली असताना हे फाटक बंद करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या सहकार्याविना रखडले आहे.
दिवा येथील रेल्वे फाटक पूर्व-पश्चिम भागांना जोडते. पूर्वी दिवा येथील लोकसंख्या कमी असल्याने या फाटकातील वाहतूक मर्यादित होती. मात्र गेल्या काही वर्षांत वस्ती प्रचंड वाढल्याने या फाटकातून होणाऱ्या वाहतुकीतही वाढ झाली आहे. परिणामी हे फाटक उघड-बंद होण्यासाठी असलेली चार मिनिटे आता पुरेनाशी होतात. त्यामुळे अनेकदा वाहतूक मार्गस्थ होण्यासाठी हे फाटक अनेकदा आठ ते दहा मिनिटेही उघडे राहते.
दिवा येथील रेल्वेच्या सहा मार्गापैकी चार मार्गावरून वाहतूक अहोरात्र चालू असते. गर्दीच्या वेळी तर दर तीन-चार मिनिटांनी एक गाडी या स्थानकातून जाते. हे फाटक चार मिनिटांपेक्षा जास्त उघडे राहिल्यास त्याचा थेट परिणाम या वाहतुकीवर होतो, असे मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकेश निगम यांनी सांगितले.
या फाटकामुळे जवळपास दर दिवशी मध्य रेल्वेच्या ४५ ते ५० सेवा खोळंबतात. परिणामी मध्य रेल्वेच्या सेवा सरासरी १५ मिनिटे उशिराने धावतात. हा प्रकार संध्याकाळच्या वेळी जास्त होत असल्याचेही निगम यांनी स्पष्ट केले.
यावर उपाय म्हणून हे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपुल बांधण्याचा प्रस्ताव रेल्वेने ठाणे महापालिकेसमोर ठेवला आहे. या पुलाची लांबी अंदाजे ३६४ मीटर एवढी असेल. त्यापैकी ७० मीटरचा भाग हा रेल्वेमार्गावरून जातो. या भागातील काम करण्यास रेल्वेने तयारी दर्शवली आहे. मात्र महापालिकेच्या हद्दीतील दोन्ही बाजूंना हा पुल उतरवण्यास जागा नसल्याने हा प्रस्ताव रखडला आहे. गेले दीड वर्ष याबाबत मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिका यांच्यात तीन बैठका झाल्या. मात्र त्यातून अद्याप काहीच निष्पन्न न झाल्याचे निगम यांनी सांगितले.