दिवाळीच्या पहिल्या दिवशी तीर्थस्थळी जाऊन सणाचा आनंद साजरा करणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील पाच मित्रांवर रविवारी पहाटे काळाने घाला घातला. महेश कदम (२४), प्रवीण राजे (२३), संदीप शिंदे (२४), अश्विन सावंत (२३) आणि किशोर अण्णाकट्टी (२६) अशी या पाच दुर्दैवी मित्रांची नावे आहेत, तर शंकर राजे (२७) हा गंभीर जखमी आहे.
मुंबई -गोवा महामार्गावरून पालीकडे निघालेल्या या तरुणांच्या हुंदाई गेटस् गाडीला वडखळ नाक्याजवळ गडबजवळ खाजगी लक्झरी बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. गाडीला धडक देऊन लक्झरी बससह अपघातस्थळापासून पळून गेलेला ड्रायव्हर संजय विष्णू मंचेकर याला अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील वर्तक परिसरातील विजयनगरात राहणारे हे मित्र दरवर्षी दिवाळीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जात असत. यंदा शनिवारी मध्यरात्री ते महेश कदम यांची गाडी घेऊन पाली येथील गणपतीच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्यापैकी संदीप गाडी चालवत होता, मात्र वडखळ नाक्याजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.
गंभीर जखमी झालेल्या शंकर राजे याच्यावर पनवेल येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी अडीचच्या सुमारास महेश, प्रवीण, संदीप आणि अश्विन यांचा मृतदेह विजयनगर परिसरात आणण्यात आला. महेश, प्रवीण, संदीप यांच्या पार्थिवावर सायंकाळी वागळे इस्टेट स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले, तर अश्विन याचे कुटुंबीय कोकणात गेले असल्याने त्याचा मृतदेह ठाणे सिव्हिल रुग्णालयात ठेवण्यात आला होता. पाचवा मित्र किशोर हा मूळचा हैदराबाद येथील असून त्याचा मृतदेह त्याच्या मूळ गावी पाठविण्यात आला आहे.
महेश याचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी, आई-बहीण असा परिवार आहे, तर किशोर याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई आणि भाऊ असा परिवार आहे. प्रवीण याच्या कुटुंबात आई व दोन बहिणी आहेत. संदीप याचे आई-वडील आणि बहीण असे कुटुंब आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या पाच जणांच्या मृत्यूने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

२० वर्षांची मैत्री
गेल्या २० वर्षांपासून या तरुणांचे कुटुंबीय हे विजयनगर परिसरात राहत होते. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांची मैत्री होती. हे पाचही जण लहान-मोठी कामे करून कुटुंबाची गुजराण करत असत, अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिली.