|| नीलेश अडसूळ

बांबूच्या काडय़ा, कापडी, कागदी कंदील बाजारात दाखल : – दिवाळी तोंडावर आल्याने दादर, माहीम, लालबागसह मुंबईतील प्रमुख शहरांच्या बाजारपेठा प्लास्टिक, चिनी बनावटीच्या कंदिलांबरोबरच पारंपरिक पद्धतीच्या कागदी आणि कापडी कंदिलांनी लखलखल्या आहेत.

बांबूच्या काडय़ा आणि रंगीबेरंगी कागदापासून बनवलेले कंदील एका दिवाळीनंतर ते पुन्हा वापरात येत नाहीत. कापडी कंदीलही स्वच्छ करून पुन्हा वापरलाच जाईल याची खात्री देता येत नाही. साधारण एक कंदील काही वर्षे वापरण्याची मानसिकता ग्राहकांमध्ये असल्याने अनेक ग्राहक याकडे पाठ फिरवतात. परंतु तरुण उत्साहाने हे कं दील खरेदी करताना दिसत आहे. बाजारात साध्या पद्धतीचा कागदी कं दील १०० ते २०० रुपयांना उपलब्ध आहे, तर बांबूंचे सांगाडे असलेले कागदी कंदील ३०० रुपयांपासून ते ६०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. दोन फु टी कंदिलाला ३०० ते ४०० तर त्याहून आकाराने मोठय़ा असणाऱ्या  कंदिलांना ५००हून अधिक रुपये आकारले जात आहेत. कागदावरील कलाकुसरीनुसार दर कमी-जास्त होताना दिसतात.

कापडी कंदील ५०० ते १००० रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. कागदी कंदिलांच्या तुलनेने या कंदिलांचे दर अधिक असल्याने मोजक्याच ग्राहकांकडून याची खरेदी होते. या कंदिलांकरता साडीचे, जरी-काठाचे कापड वापरले जाते. पांढऱ्या रंगाच्या कापडावर विविध नक्षीसोबतच शिवाजी महाराज, बार्बी, छोटा भीम आणि विविध कार्टूनचे चित्र छापण्यात आले आहेत. प्लास्टिकला पर्याय म्हणून पुठ्ठे, ज्यूट आदी घटकांचा वापर क रण्यात आला आहे. अनेकांनी बांबूंच्या सांगाडय़ांना पर्याय म्हणून प्लास्टिकचे सांगाडे तयार करून घेतले आहेत. या सांगाडय़ांची किं मत १५० ते २५० रुपये असून दरवर्षी के वळ कागद बदलावा लागत असल्याने लहान मुलांची याला अधिक पसंती आहे. तोरणांमध्ये वापरले जाणारे लहान कं दील १५ ते ३० रुपये किमतीत उपलब्ध आहेत.

माहीम येथील कंदील गल्लीतील मनीष नार्वेकर आणि भावेश किल्लेकर हे दोन तरुण मागील काही वर्षांपासून कागदी कंदील बनवत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिदशेतील हे तरुण अभ्यास आणि कला यांची सांगड घालून अर्थार्जन करत आहेत. ‘हा वारसा घरातून मिळाला असून त्यात नवनवीन प्रयोग करत आकर्षक कं दील घडवण्याचा माझा प्रयत्न असतो. यासाठी महिनाभर आधीच तयारीला लागावे लागते,’ असे मनीष सांगतो. तर कागदी कंदील दिसायला आकर्षक असले तरी प्लास्टिकच्या तुलनेने महाग असल्याने अजूनही मनासारखा प्रतिसाद मिळत नसल्याची खंतही मनीषने व्यक्त केली.

ऑनलाइन व्यासपीठ

अनेक तरुणांनी कागदी आणि कापडी कंदिलांची ऑनलाइन विक्री सुरू के ली आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, फे सबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांचा जोरदार वापर के ला जात आहे. साडय़ांचे कंदील तयार  करण्यात अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कागदी कंदिलातही वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न आहे. गेली तीन वर्षे ऑनलाइन माध्यमातून कंदील विक्री करणारी फाल्गुनी पवार सांगते, आपल्या कंदिलांमध्ये आकर्षकता असेल तर लोक हमखास संपर्क  साधतात. त्यासाठी समाजमाध्यम हा उत्तम पर्याय आहे.