इंद्राणी, श्यामवर न्यायालयीन कोठडीत
बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि श्यामवर राय यांची २१ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, शीनाच्या मृतदेहाचे अवशेषांचे नमुने इंद्राणीच्या डीएनएबरोबर जुळत असल्याचा अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
शीना बोरा हत्या प्रकरणात अटकेत असलेली तिची आई इंद्राणी मुखर्जी, श्यामवर राय यांच्या चौदा दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यांना दुपारी वांद्रे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने अपेक्षेप्रमाणे दोघांची २१ सप्टेंबपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. या प्रकरणातील अन्य एक आरोपी संजीव खन्ना याला सोमवारी पहाटे कोलकाता येथे तपासासाठी नेल्याने न्यायालयात हजर केले नव्हते. त्यामुळे त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. कोलकाता येथून खन्नाने पाठवलेले ईमेल्स आणि अन्य काही बाबींचा तपास करण्यासाठी त्याला कोलकाताला नेल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर इंद्राणीला भायखळा येथील कारागृहात तर श्यामवर रायला आर्थर रोड कारागृहात हजर करण्यात आले. तेथे त्यांना स्वतंत्र विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, इंद्राणीच्या वकिलांनी पुन्हा एकदा घरच्या जेवणासाठी अर्ज केला असून त्यावर येत्या गुरुवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी जेवणातून विषबाधेच्या शक्यतेमुळे घरच्या जेवणाची परवानगी नाकारण्यात आली होती.
नमुने जुळले
या प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे ठरणारे डीएनए नमुने जुळल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी पेणच्या गागोदे गावातील जंगलातून शीनाच्या मृतदेहाचे काही अवशेष गोळा केले होते. ते अवशेष आणि शीनाचा भाऊ मिखाइल यांचे डीएनए तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. इंद्राणीच्या डीएनएशी ते मिळत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे इंद्राणीच्या गुन्हय़ातील सहभाग स्पष्ट करणे सोपे होणार आहे.