लोकसभा निवडणूक दक्षिण मुंबई मतदार संघातून लढवण्यास मी इच्छुक आहे. भाजपा-शिवसेना यांची युती झाली तर शिवसेनेनं ही जागा माझ्यासाठी सोडावी अशी माझी इच्छा आहे असं केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवले यांनी केली आहे. शिवसेनेने माझ्या विरोधात उमेदवार दिला तर त्यांना मी यापूर्वीही हरवलं आहे हे त्यांनी विसरू नये असंही आठवलेंनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भाजपा आणि शिवसेना यांची युती व्हावी अशी आमची इच्छा आहे. भाजपा आणि शिवसेना गेल्या ३० वर्षांपासून एकत्र आहेत. मी गेल्या पाच वर्षांपासून महायुतीत आहे. मी मंत्रीपदासाठी भाजपाकडे गेलो नाही, भाजपाने मला जवळ केलं. काँग्रेसचा पराभव करण्यासाठी मी भाजपासोबत गेलो. भाजपा आणि शिवसेना एकत्र आले नाही तरीही आरपीआय भाजपासोबतच राहणार असेही आठवलेंनी स्पष्ट केले. आता युती होणार नाही अशी शक्यता वर्तवली जात असतानाच शेवटी भाजपा आणि शिवसेना एकत्र येतील असे वाटत असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे. एवढंच नाही तर आरपीआयला अद्यापपर्यंत राज्यात मंत्रीपद मिळालेले नाही, हे आश्वासन त्यांनी पूर्ण करावे अशीही मागणी आठवलेंनी केली.

लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी दक्षिण मुंबईतून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे एकीकडे युतीचं काय होणार हा पेच कायम असतानाच दुसरीकडे युती झालीच तर आठवलेंसाठी सहजासहजी शिवसेना ही जागा सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.