औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या अधिकच गरम होत असल्याचं दिसत आहे. औरंगाबादचे संभाजीनगर केले जावी, अशी मागणी भाजपा व मनसेने लावून धरली आहे. तर, औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे. एवढंच नाही तर बाळासाहेब ठाकरेंचं हे स्वप्न होतं त्यामुळे ते पूर्ण करणारचं असं शिवसेनेने म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा साधताना दिसत आहेत.

“औरंगजेबचे व्यक्तिमत्व वादग्रस्त राहिले आहे. त्याच्या प्रत्येक कृतीशी काँग्रेस सहमत असणं गरजेचं नाही. संभाजीराजे महान योद्धे होते, त्यांचा त्याग महान आहे. याबाबत काहीच मतभेद नाही. मात्र सरकार चालवत असताना शिवसेना महापुरुषांना मध्ये आणेल तर नक्कीच नुकसान होईल, स्वतः निर्णय घ्यावा.” असा इशारा काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेला दिला आहे.

तसेच, “औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुनाच कार्यक्रम आहे. मात्र सरकार तीन पक्षांचं आहे, हे विसरून चालणार नाही. आघाडीची सरकारं किमान समान कार्यक्रमांवर चालतात. कुणाच्या वैयक्तिक कार्यक्रमावर नाही. किमान समान कार्यक्रम काम करण्यासाठी तयार केला आहे, नाव बदलण्यासाठी नाही.” असं देखील निरुपम यांनी ट्विटद्वारे शिवसेनेला सुनावलं आहे.

औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत ठिणगी?

तर, “या अगोदर औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. अशा नामांतरामुळे सामान्यांचा विकास होतो असे आम्ही मानत नाही. केवळ नामांतरच नाही तर घटनेतील प्रास्ताविकेमध्ये दिलेल्या मूल्यांची प्रतारणा होईल अशा कोणत्याही कृतीस कॉंग्रेसचा विरोध असेल.” असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी स्पष्ट केलेले आहे.

औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये ‘नुरा कुस्ती’- फडणवीस

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. “काँग्रेसने औरंगाबादच्या संभाजीनगर या नामकरणाला विरोध केला काय किंवा नाही केला काय? शिवसेनेला हा मुद्दा फक्त निवडणुकीपुरता हवा असतो. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात नुरा कुस्ती सुरु आहे.” असं फडणवीस म्हणाले आहेत.