सरकारने करोनाचे ५०० मृत्यू लपविल्याचा आरोप

राज्यातील करोनाची स्थिती हाताबाहेर गेली असून मृत्यूचे थैमान सुरू आहे. मुंबईतील ५०० करोना मृत्यूचे आकडे अजूनही लपविले जात असून महाराष्ट्र करोनाचा देशातील हॉटस्पॉट झाला आहे. या संकटातही  नातेवाईक, ठेके दारांच्या माध्यमातून प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम सुरू असून सरकारचं हे वागण बर नाही. एवढेच नव्हे तर अनेक महत्वाचे प्रकल्प आणि योजना बंद करीत राज्य अहंकारासाठी चालवू नका, सगळेच प्रश्न  प्रतिष्ठेचे करायचे नसतात. राजकारणात असा अहंकार कामाचा नसतो, करोना भ्रष्टाचारातील कोणालाही आम्ही सोडणार नाही , अशा शब्दांत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले.

विधिमंडळात २९ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर व विशेषत:  मुख्यमंत्र्यावर  हल्ला चढविला. राज्यातील करोनाची स्थिती, आरोग्यव्यवस्था, विदर्भातील पूर अशा अनेक  प्रश्नांवर लक्ष वेधत सरकारने लोकांना मरणासाठी वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. देशात सर्वाधिक करोना बाधित राज्यात असून सर्वाधिक पोलिस बाधित झालेत. आरोग्य कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचे प्रमाण सुद्धा राज्यात सर्वाधिक आहे. देशातील एकूण मृत्यूंपैकी ३८ टक्के मृत्यू राज्यात असून मुंबईतील ५०० करोना मृत्यूंचा आकडा सरकार लपवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारने सर्वांना मोफत उपचार देण्याची घोषणा केली होती, प्रत्यक्षात मात्र केवळ  नऊ हजार  लोकांना महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ झाला असून गरीबांना उपचारासाठी रूग्णालयात प्रवेश मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. मुख्यमंत्री मुंबई आणि उपमुख्यमंत्री पुण्याची काळजी घेत आहेत,मग राज्यातील अन्य शहरे महाराष्ट्रात नाहीत का, अशी विचारणाही त्यांनी केली.

‘मेट्रोचे कारशेड आरेमध्येच हवे’

मुंबईतील मेट्रोचे आरेमधील कारशेड अन्यत्र हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी  अहंकारातून घेतल्याचे टीकास्त्रही फडणवीस यांनी यावेळी सोडले. युती सरकारच्या काळात ठाकरे यांच्या विरोधानंतरच आरेमधील कारशेड अन्यत्र हलविण्याबाबत सर्व पर्याय पडताळून पाहण्यात आले होते. मात्र अनेक तज्ज्ञांशी चर्चा के ल्यानंतर आरेशिवाय पर्याय नसल्याचे समोर आले. सर्वोच्च न्यायालयानेही या ठिकाणी कारशेड उभारण्यास परवानगी दिली असून ही जागा मोफत मिळाली आहे. मात्र आता अहंकारापोटी हे कारशेड गोरेगाव  पहाडी येथे स्थलांतरीत केले जात आहे. त्यामुळे या प्रकल्पावर झालेल्या खर्चाचे काय, शिवाय डेपोच्या कामाला स्थगिती दिल्याने दरदिवशी पाच कोटींचे नुकसान होत असून सचिव समितीच्या अहवालावरही सरकार निर्णय घेत नाही. वाढलेला खर्च, जागा खरेदीचा खर्च याचा संपूर्ण भार सामान्य मुंबईकरांवर पडणार आहे. प्रत्येक प्रश्न प्रतिष्ठेचे करायचे नसतात. अहंकार सोडून आरेचा पुनर्विचार करून ते आहे तेथेच ठेवावे असे आवाहन फडणवीस यांनी केले.