घरपोच ऑनलाइन दारू पोहचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. घरपोच दारूच्या बाटल्या पोहचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहचवा, असे म्हणत राज्य सरकारला त्यांनी सुनावले आहे.
ऑनलाइन दारू देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणारे नाही. मात्र राज्याची ‘शोभा’ करण्याचा प्रयोग रोजच सुरु असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.

मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयंकर आहे. मंत्री फिरत आहेत, त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील, दुष्काळग्रस्तांना रांगेत उभे राहून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवी आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. यासंदर्भात एक पत्रक शिवसेनेने प्रसारित केले आहे ज्यामध्ये ही भूमिका मांडण्यात आली आहे.

मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर पसरली. राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक समाजसेवी संघटनांनी आक्षेप घेतला. राज्य सरकार मद्यप्राशनाला प्रोत्साहन देत आहे, अशी टीकाही अनेकांनी केली.

उत्पादनशुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निर्णयासाठी सरकार अनुकूल असल्याचे म्हटल्याने राज्य सरकारच्या अडचणीत भर पडली. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल, असे त्यांनी म्हटले होते. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी घरपोच दारुची सुविधा देण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे स्पष्ट केले. आता यावर शिवसेनेनेही टीका करत दारु पोहचवण्यापेक्षा दुष्काळग्रस्तांना मदत घरपोच द्या असे म्हटले आहे.