डॉक्टर, परिचारिकांमध्ये अस्वस्थता; कुटुंबाला संसर्ग होऊ न देण्यासाठी घराकडे पाठ

मुंबई : करोनाच्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि परिचारिकाही दडपणाखाली वावरताना दिसत आहेत. कुटुंबाला करोनाची लागण होऊ नये यासाठी काही कर्मचाऱ्यांनी लहान मुलांना घरी ठेवून रुग्णालयातच वास्तव्य केले आहे, तर काहींनी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना नातेवाईकांच्या घरी पाठविले आहे. यातील काही कर्मचारी घरून ये—जा करत असल्याने त्यांच्यावर मानसिक दडपण आहे. आपल्यामुळे कुटुंबातील प्रिय सदस्याला करोनाची लागण होऊ नये याची काळजी त्यांना लागून राहिली आहे.

सेवन हिल्स रुग्णालयात तात्काळ पोहोचण्याचे आदेश मिळताच एका परिचारिकेने आपली दोन कच्चीबच्ची बहिणीच्या हवाली केली, तर दुसरीने दोन्ही लहान मुलींची जबाबदारी पतीवर सोपवून घर सोडले. त्यानंतर या परिचारिकांना सेवन हिल्स रुग्णालयातून घरी जाताच आलेले नाही. आपली आई घरी कधी येणार याकडे मुलांचे डोळे लागले आहेत.

परदेशवारी करून विमानतळावर उतरणाऱ्यांची तपासणी करून काही जणांना सेवन हिल्स रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत होते. या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मिळताच परिचारिका आदिती यांनी  आपल्या दोन मुलांची बहिणीकडे रवानगी केली. घरी परत कधी येणार, असा सवाल मुले करीत होती. पण त्याचे उत्तर आदितीजवळ नव्हते. पतीचा निरोप घेऊन त्यांनी घर सोडले आणि तडक रुग्णालय गाठले. सकाळी आठ ते रात्री १२ अशी अखंड रुग्णसेवा त्या करीत आहेत. दहा दिवस उलटून गेले. मध्यरात्री झोपायचे आणि सकाळी उठून रुग्ण सेवेत रुजू व्हायचे असा त्यांचा दिनक्रम आहे.

आणखी एक परिचारिका दिव्या दोन लहान मुलींना नवऱ्याकडे सोपवून रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनाही आजपर्यंत घरी जाता आलेले नाही. मुली नित्यनियमाने दररोज मोबाइलवर संपर्क साधतात. अनेकदा त्यांना मुलांचा फोनही घेता येत नाही. रुग्णालयात सतत रुग्णांच्या संपर्कात असल्यामुळे संसर्गाचा मोठा धोका असतो. कुटुंबाला त्याची बाधा होऊ नये म्हणून दिव्या रुग्णालयातच थांबल्या आहेत. घरी जाण्या-येण्याचा वेळ वाचतो आणि विश्रांती घेता येते. त्याचबरोबर कुटुंबाला संसर्ग होण्याचा धोकाही टळतो, पण मुलींची खूप आठवण येते, असे व्याकूळ मनाने त्या सांगत होत्या.

परदेशवारी करून आलेल्या अनेकांना सेवन हिल्स रुग्णालयातील पालिकेच्या विलगीकरण कक्षात कसा अनुभव येईल याचा प्रश्न पडला होता.  तेथील वैद्यकीय सुविधेबाबत ही मंडळी साशंकच होती. पण विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर ही मंडळी पालिका आणि तेथे तैनात डॉक्टर, परिचारिकांना दुवा देत आपापल्या घरी परतल्याचा अनुभव सेवन हिल्स रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. महारुद्र कुंभार यांनी कथन केला.

ही सर्व मंडळी सलग १६ तास सेवा देत आहेत. त्यामुळेच करोनाबाधित आणि संशयितांसाठी ते देवदूत बनले आहेत. कस्तुरबा, नायर, केईएम, टिळक रुग्णालय किंवा अन्य कोणतेही पालिकेचे रुग्णालय असो, सर्वच ठिकाणी असेच काहीसे चित्र आहे.