News Flash

कागदी पिशव्या वापरा, पर्यावरणाचा ऱ्हास टाळा!

प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानीकारक आहेत.

भामला फाउंडेशनतर्फे आयोजित पर्यावरण दिन कार्यक्रमात संजय दत्त यांचे आवाहन
प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानीकारक आहेत. प्लास्टिकच्या पिशव्यांना कागदी पिशव्या हा उत्तम पर्याय आहे. कारावासातील दिवसांमध्ये कागदी पिशव्या तयार करण्याचे धडे गिरवले होते. या पिशव्या दहा किलोपर्यंत वजन सहज पेलू शकतात. त्यामुळे लोकांनी कागदी पिशव्याच वापराव्यात, असे आवाहन अभिनेता संजय दत्त यांनी केले. एवढय़ावरच न थांबता त्यांनी चक्क कागदापासून पिशव्या तयार करून दाखवल्या. भामला फाउंडेशनतर्फे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कार्टर रोड, वांद्रे येथे झालेल्या कार्यक्रमातून लोकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळाला.
मुंबईतील पर्यावरणाच्या प्रश्नावर १९९८पासून कार्यरत असलेल्या भामला फाउंडेशनतर्फे दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ५ जून रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या वर्षीही कार्टर रोड येथील अ‍ॅम्फि थिएटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात हिंदी चित्रपटसृष्टीतील झरीन खान, संजय दत्त, दिया मिर्झा, जॅकी श्रॉफ, सोनू सूद, कुणाल गांजावाला, शब्बीर अहलुवालिया, पूजा बात्रा, रविना टंडन, जावेद जाफरी, सूरज पांचोली आदी नावाजलेल्या कलाकारांनी उपस्थिती दर्शवत पर्यावरण संवर्धनाला सक्रीय पाठिंबाही दर्शवला. त्याचप्रमाणे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, उपमहापौर अलका केरकर, प्रिया दत्त आणि स्मिता ठाकरे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत भामला फाउंडेशनचे आसीफ भामला यांच्यासह आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात श्यामक दावर यांच्या चमूने विविध नृत्ये सादर करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यानंतर संजय दत्त यांनी मंचावर येत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिकच्या पिशव्या हद्दपार करायला हव्यात, असे त्यांनी सांगितले. तेवढय़ावरच न थांबता त्यांनी कागदापासून पिशव्या तयार करून त्या कागदी पिशव्या वापरण्याचे आवाहनही लोकांना केले.

वसुंधरेच्या रक्षणासाठी..
पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण, कचरा व्यवस्थापन तसेच पर्यावरणपूरक जीवनशैली या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमावेळी पर्यावरणाचे रक्षण कसे करावे या सदंर्भात काही उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली. तसेच या दिनाचे औचित्य साधून कचरा सफाईच्या कार्यक्रमाची सुरूवातही करण्यात आली. भामला फाऊंडेशनसोबत अनेक सामाजिक संस्था या कार्यक्रमात सहभागी झाल्या. समाजाला पर्यावरण रक्षणाच्या आघाडीवर सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असे भामला फाऊंडेशनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2016 1:00 am

Web Title: dont use plastic bags and control pollution
टॅग : Plastic Bags,Pollution
Next Stories
1 केरळमध्ये दोन दिवसांत मोसमी पाऊस
2 दादरमध्ये एसटीच्या धडकेत एकाचा मृत्यू
3 दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार
Just Now!
X