डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण

मुंबई : डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आरोपींनी नष्ट केली गेली की लपवून ठेवली आहे, हे शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखेकडून आरोपींच्या पोलीस कोठडीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.

आग्रीपाडा पोलिसांनी डॉ. पायल यांचा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवला होता. त्यात डॉ. पायल यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीची छायाचित्रे सापडली. मात्र पायल यांच्या खोलीची झाडाझडती घेणाऱ्या आग्रीपाडा  पोलिसांना किंवा गुन्हे शाखेला चिठ्ठी सापडली नव्हती. त्यामुळे आत्महत्येनंतर डॉ. पायल यांच्या खोलीत जाणाऱ्या दोन महिला डॉक्टरांनी ती नष्ट केली असावी किंवा लपवून ठेवली असावी, या दोनच शक्यता उद्भवतात. यामुळे आरोपींची पुन्हा चौकशी करण्याची मागणी तडवी कुटुंबातर्फे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली. डॉ. पायल यांच्या खोलीत आरोपी पुन्हा का गेल्या, तेथे त्यांनी काय केले हे गुन्हे शाखेला शोधता आलेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले. न्यायालयीन कोठडीतील आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत घेण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या काही आदेशांचा अभ्यास करत आहोत. त्यानंतर अर्जाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी स्पष्ट केले. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आरोपी नष्ट करू शकतील, पोलिसांच्या हाती ती लागणार नाही याभीतीपोटी पायलने चिठ्ठीचे छायाचित्र मोबाइलमध्ये टिपले असावे, असे पायल यांचे पती डॉ. सलमान यांनी सांगितले.