‘लोकसत्ता गप्पा’च्या व्यासपीठावर..

मुंबई : स्वरांचा वारसा जोपासणाऱ्या आणि तो जपण्याची प्रेरणा पुढील पिढीतही रुजवणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संवाद म्हणजे जणू एक सुरेल मैफलच! त्यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या या गप्पांच्या आगळ्यावेगळ्या मैफलीचा अनुभव ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाद्वारे रविवारी रसिकांना लाभणार आहे.

प्रभा अत्रे यांचं व्यक्तिमत्त्व अनेकपदरी आहे. मात्र त्यातून स्वरांशी असलेलं नातं अधिक पक्कं झालं आहे. शास्त्रीय गायन, बंदिशींची रचना, रागांची निर्मिती, लेखन.. या सगळ्यांमध्ये स्वरतन्मयता हाच एकमेव धागा आहे. किराणा घराण्याची चौकट काटेकोरपणे जपतानाही आपल्या प्रयोगशील गायकीने त्यांनी रसिकांच्या मनातील सर्व चौकटी मोडून टाकल्या आहेत.

वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेली त्यांची संगीतसाधना आजही अव्याहत सुरू आहे. पंडित सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांची शिष्या असलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी स्वत: नवनवीन रागांची रचना केली. संगीताचा हा अभ्यास त्यांनी ‘स्वरमयी’, ‘स्वरांगिणी’ अशा पुस्तकांतून लोकांपर्यंत रसाळ आणि सहज पद्धतीने पोहोचवला. त्यांची ही अफाट संगीतसाधना, त्यांचे अनुभव, त्यांचे विचार केसरी टूर्स सहप्रायोजित या कार्यक्रमातून उलगडणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रित रसिकांसाठी आहे.

दैनंदिन वृत्तव्यवहाराच्या पलीकडे जाऊन विचारांच्या नवनव्या दिशांचा शोध घेण्यासाठीचा वाचकस्नेही संवादसेतू असा हा ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रम. ख्यातकीर्त साहित्यिक एस. एल. भैरप्पा, ज्येष्ठ गायक-संगीतज्ञ-लेखक पं. सत्यशील देशपांडे, अभिजात संगीतात स्वत:चा ठसा उमटविणारे पं. मुकुल शिवपुत्र, लेखक-शायर जावेद अख्तर, कलावंत नसिरुद्दीन शहा, मनस्वी कवी गुलजार, चित्रकार सुभाष अवचट ते रंगभूमी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दिग्दर्शनाची मोहोर उमटवणाऱ्या सई परांजपे अशा मातब्बर अवलियांनी या उपक्रमाला वेगळ्या उंचीवर नेले. ‘लोकसत्ता गप्पां’च्या या नव्या पर्वात डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी संवाद साधण्याची संधी निमंत्रितांना मिळणार आहे.