बोरिवली न्यायालयात एका आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. शनिवारी दुपारी ही घटना घडली.
खुनाच्या प्रकरणात पकडण्यात असलेला हरिश मांडवीकर (३५) याला शनिवारी दुपारी ठाणे येथून बोरिवलीच्या न्यायालयात आणण्यात आले होते. एका प्रकरणात मालाड पोलिसांना त्याची पोलीस कोठडी हवी होती. दुपारी ४.३० च्या सुमारास त्याला पोलीस व्हॅनमधून पुन्हा ठाणे तुरुंगात नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने व्हॅनमध्ये बसण्यास नकार देत पोलिसांना धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारात गोंधळ उडाला. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अधिक कुमक मागविली. पोलिसांची कुमक आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. दरम्यान, व्हॅनमध्ये घेऊन जात असताना त्यांचे हात मोकळे होते, असे पोलिसांनी सांगितले. बोरिवली पोलिसांनी अटक करून त्याला रविवारी वांद्रे येथील सुट्टीकालीन न्यायालयात हजर केले. त्याला ५ फेब्रुवारीपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.