मुंबई : दादर येथील ड्राईव्ह इन लसीकरणाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता ज्येष्ठ नागरिक आणि अपंगाना वाहनातच लस देण्याची सुविधा उपलब्ध करावी, अशी वाहनतळे मुंबईतील प्रत्येक विभागांमध्ये २४ तासांत सुरू  करावीत, अशी   सूचना पालिकेने दिली आहे. त्यामुळे आता सहा वाहनतळे लवकरच सुरू होणार आहेत.

दादरच्या कोहिनूर वाहनतळावर पालिकेने पहिले लसीकरण करणारे वाहनतळ सुरू केले. याला प्रतिसाद मिळत असून यामुळे गर्दीचे नियंत्रण केले जात असल्याने करोना प्रतिबंधात्मक उपायांचेही पालन केले जाते. त्यामुळे पालिकेने आता अशी आणखी वाहनतळे लसीकरणासाठी २४ तासांत कार्यान्वित करण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरीतील क्रीडा संकुल, कुपरेज मैदान, शिवाजी स्टेडिअम, ओव्हल मैदान, एमआयजी, एमसीए मैदान, रिलायन्य जिओ उद्यान, मुलुंडचे शिवाजी उद्यान, चेंबूर सुभाष नगर आणि टिळक नगर मैदान, घाटकोपर पोलिस मैदान, चुनाभट्टी शिवाजी मैदान अशा मुंबईतील मोठ्या मैदानाचा यासाठी वापर करता येईल असेही पालिकेने यात सूचित केले आहे.

बाहेरून आत येणाऱ्या गाड्यांसाठी एकेरी रांग करून सर्व व्यवस्थ वाहनतळाच्या आत केली जावी. जेणेकरून वाहनतळाकडे येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेत अडथळे निर्माण होणार नाहीत. वाहनतळावर तात्पुरडे शेड उभारून लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुविधा, कोणतेही दुष्परिणाम जाणवल्यास तातडीने सेवा देण्यासाठी व्यवस्था, रुग्णवाहिका इत्यादी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. पुरेसे मोबाईल शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असे या आदेशात नमूद केले आहे.

लसीकरणासाठी आलेल्या व्यक्तीसोबत वाहन चालविणाऱ्याबरोबरच आणखी एखादी व्यक्ती उपस्थित असणे बंधनकारक आहे. जेणेकरून लस दिल्यावर गाडीत कोणताही त्रास झाल्यास तातडीने व्यक्तीकडून संबंधितांना कळविले जाईल, असे या आदेशात म्हटले आहे.

कोव्हिशिल्डची मात्रा या केंद्रावर नोंदणी करून वेळ घेतलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांनाच कोव्हिशिल्ड लस दिली जाईल, असे या आदेशात स्पष्ट केले आहे.