मुलीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने एका चलकाने आपल्याच मालकाच्या दोन जुळ्या मुलांचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या चालकाने मुलांचे अपहरण केल्यानंतर या चालकाच्या एका मित्राने या मुलांचे वडील म्हणजेच मुंबईतील एका प्रतिष्ठित बिल्डरला फोन करुन एक कोटींची खंडणी मागितली. एका इंटरनॅशनल कॉलिंग अ‍ॅपवरुन हा फोन करण्यात आला होता. आपल्याला एक कोटी रुपये मिळतील असा या चालकाचा अंदाज होता मात्र त्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी या चालकाला आणि त्याच्या साथीदाराला अटक करुन मुलांची सुटका केली. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

चालकच पोलिसांकडे आला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चालकाच्या मालकाला दहा वर्षाची दोन जुळी मुलं आहेत. हा चालक मागील आठवड्यात तीन वेळा अंधेरीमधील मनीष नगर येथे या मुलांना टेनिस कोचिंग क्लाससाठी घेऊन गेला होता. नेहमीप्रमाणे २५ जानेवारी रोजीही चालक या मुलांना घेऊन टेनिस क्लासला गेला. मात्र त्यानंतर हा चाकल डीएन नगर पोलीस स्थानकामध्ये आला. पोलिसांकडे आल्यानंतर या चालकाने मालकांच्या दोन्ही मुलांचं कोणीतरी अपहरण केल्याचं सांगितलं.

चालकाने पोलिसांना काय सांगितलं?

आपण मुलांना घेऊन जात असतानाच एका व्यक्तीने चाकूचा धाक दाखवून आपल्या फॉर्चूनर गाडीमध्ये प्रवेश केला आणि गाडी जुहूच्या दिशेने घेऊन गेला. येथे गेल्यानंतर अपहरण करणाऱ्या व्यक्तीने मला आणि मुलांना दोन गोळ्या खाण्यासाठी भाग पाडलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी माझे हात बांधले. त्यानंतर थोड्याच वेळात तीन मोटरसायकलवर तिथे सहा जण आले. त्यानंतर त्यांनी या मुलांपैकी एकाला क्रोमा मॉलसमोर उभ्या असणाऱ्या रिकाम्या बसमध्ये कापडाने बांधून ठेवले तर दुसऱ्या मुलाला ते अपहरणकर्ते स्वत:बरोबर घेऊन गेल्याचं चालकाने पोलिसांना सांगितलं. चालक पोलिसांकडे तक्रार करत असतानाच दुसरीकडे त्याच्या मित्राने इंटरनॅशनल कॉलिंग अ‍ॅपवरुन या मुलांच्या वडीलांना फोन करुन एक कोटी रुपयांची खंडणी मागितली.

…आणि सत्य समोर आलं

पोलिसांनी तातडीने सुत्रं फिरवत एका मुलाची कारमधून सुटका केली तर बसमध्ये बांधून ठेवण्यात आलेल्या मुलाने लोकांच्या मदतीने आधीच स्वत:ची सुटका करुन घेतली होती. पोलिसांनी तपास सुरु केला असता त्यांना चालकाने सांगितलेल्या घटनाक्रमासंदर्भात शंका येऊ लागली. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चालकाने आपला गुन्हा कबुल केला. मला माझ्या मुलीच्या लग्नसाठी पैशांची आवश्यकता होती म्हणून आपण हे कृत्य केल्याचं चालकाने पोलिसांना सांगितलं. मुलीच्या लग्नासाठी लागणाऱ्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी मी माझ्या मेव्हण्याला दिल्लीहून मुंबईला बोलवून घेतलं होतं. याच व्यक्तीने खंडणीसाठी बिल्डरला फोन केला होता. या रक्कमेममधील ५० टक्के रक्कम म्हणजेच ५० लाख रुपये देण्याचा शब्द या चालकाने आपल्या मेव्हण्याला दिला होता अशी माहितीही चालकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आहे.