जालना, औरंगाबादमधून मुंबईत आलेल्या दुष्काळग्रस्तांच्या भावना
गावाकडे शेतीवाडी आहे, घर आहे, जिव्हाळय़ाची माणसं आहेत, पण तरीही त्यांची गावी परतण्याची इच्छा नाही. कारण फक्त एकच- पाण्याचे दुर्भिक्ष. ‘‘गावाकडं पानी न्हाई, चाळीस रुपयांत पाण्याचा ड्रम भेटायला रोज नाय परवडत, म्हून आता आम्हांला परत जायचं नाय’’, अशा शब्दांत मुंबईत राहत असलेल्या दुष्काळग्रस्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुष्काळाने होरपळलेले औरंगबाद, जालना अशा मराठवाडय़ातील अनेक भागांतील ग्रामस्थ कुटुंबांसह मुंबईत दाखल झाले आहेत. इथे मिळेल त्या मोकळय़ा जागेवर त्यांच्या झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. पावसाळय़ापूर्वी निघणाऱ्या मुंबई महापालिकेच्या नालेसफाईच्या कामांचा रोजगार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी मिळतंय.. अशा परिस्थितीमुळे मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त आता मुंबईतच राहण्याच्या मन:स्थितीत पोहोचले आहेत. गाव दुरावण्याचं दु:ख त्यांना जरूर आहे, पण त्याहीपेक्षा मोठं समाधान कुटुंबाच्या दोन वेळच्या जेवणपाण्याची सोय होण्याचं आहे. १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर चेंबूर भागात जालना, औरंगाबाद येथून आलेल्या दुष्काळग्रस्तांनी आपल्या वस्त्या वसवल्या होत्या, याच वस्त्या आता पुन्हा नव्याने भरू लागल्या असून मराठवाडय़ातून व विशेषत: जालना, औरंगाबाद, परभणी येथून येथे दुष्काळग्रस्त येऊ लागले आहेत. यामध्ये गरीब, मजूर, शेतकरी व बहुजन समाजातील कुटुंबांचे प्रमाण जास्त आहे. अशाच वस्त्यांमध्ये फिरून तेथील परिस्थितीचा घेतलेला आढावा..

आनंदनगर वस्ती, चेंबूर
आचार्य महाविद्यालयाच्या समोर पूर्वीपासूनच असलेल्या दुष्काळग्रस्तांच्या वस्तीत सध्या औरंगाबाद येथून दुष्काळग्रस्त आले आहेत. येथे औरंगाबाद येथील पैठण तालुक्यातून आपला मुलगा व पतीसह आलेल्या इंदुबाई गायकवाड म्हणाल्या की, गावाकडे चाळीस रुपयाला पाण्याचा वीस लिटर ड्रम मिळतो. असे दिवसात दोन-तीन ड्रम लागतात, पण हाताला काम नसल्याने रोजचा ड्रम परवडत नाही म्हणून २-३ महिन्यांपूर्वी येथे आलो. आता इथे मुलाला आणि मला नालेसफाईचे काम मिळाले, त्यामुळे परत जाणार नाही. तर, जालन्याच्या अंबड तालुक्यातील शिरसगाव येथून पाच महिन्यांपूर्वी आलेले किसन मगरे म्हणाले, माझे पाच जणांचे कुटुंब असून आम्हाला अर्धा तास चालल्यावर दोन हंडे गावी पाणी मिळायचे, तेही बंद झाल्यावर आम्ही मुंबईत आलो. या वस्तीत लग्न असल्याने येथे पाहुणे म्हणून आलेल्यांनीही गावी परत जाणार नसल्याचे या वेळी सांगितले. ३५० लोकसंख्येच्या या वस्तीत आता नातेवाईक व ओळखीच्यांच्या मदतीने दुष्काळग्रस्त येत असून सध्या येथे २०-२२ कुटुंबे आली आहेत. यातील काहींनी दोन हजार रुपये भाडय़ाने येथे घरे मिळवली आहेत.

श्रमजीवी नगर वस्ती, चेंबूर
चेंबूर स्थानकापासून दहा मिनिटांवर पूर्व द्रुतगती मार्गालगत श्रमजीवी नगर वस्ती असून आता जालना जिल्हय़ातील अंबड तालुक्यातील हातगाव, बोधनापुरी या गावांतील शंभर तरुण चार-पाच महिन्यांपूर्वी येथे आले आहेत. या तरुणांनी कचरा व नालेसफाईची कामे पत्करली आहेत. त्यांच्यासह दुष्काळी भागातून आलेल्या सुमन साळवे म्हणाल्या, ‘‘गावात पाणी नाही, त्यामुळे आम्ही येथे आलो. सध्या रस्त्यावरचा कचरा वेचण्याची कामे करतो. त्यातून थोडे पैसे मिळतात.
मात्र पोटापाण्याचा प्रश्न मिटतो,
त्यामुळे आता आम्हाला परत जायचं नाय!’’

राहुल नगर वस्ती, सायन-ट्रॉम्बे रस्ता
‘‘हापशी हानू-हानू दमलोया, पन पानी काय लागत न्हाई म्हणून आम्ही गाव सोडून इथं आलो,’’ अशा शब्दांत वयाची साठी ओलांडलेल्या जयवंता सरोदे आपली परिस्थिती मांडतात. जालन्यातील माळी-पिंपळगाव येथून ७५ वर्षीय पती भिवाजी यांच्यासह जयवंता आपल्या नातेवाईकांकडे मुंबईत आल्या आहेत. आपल्या गावातील भीषण दुष्काळाचे त्यांनी वर्णन केले. ‘‘गावातल्या नद्या आटल्या. म्हणून नद्या खोदून आम्ही पाणी मिळवण्याचा प्रयत्न केला. पुढे ते पाणीही मिळेनासे झाल्याने मुंबईला पोहोचलो,’’ असे सरोदे या सांगतात. जवळपास दोन हजार लोकसंख्या असलेल्या या वस्तीत ५० ते ६० कुटुंबे ही जालना जिल्हय़ातून आली आहेत.

‘जालन्याला पाण्याची रेल्वे का नाही?’
दुष्काळ काय फक्त लातूरमध्येच पडला आहे का? जालन्यात नाही का? असा सवाल दुष्काळग्रस्त व मराठवाडा विकास संघाचे दादाराव पटेकर यांनी केला. ते म्हणाले, ‘‘प्रत्येक रेल्वे ही लातूरलाच जाते, मात्र आमच्या गावातही तितकीच वाईट परिस्थिती आहे, मग तिथे पाण्याची रेल्वे का पाठवत नाही?’’

दुष्काळग्रस्तांची आश्रयस्थाने
* गोरेगाव, आरे कॉलनी येथील महात्मा फुले वस्ती
* कांदिवलीमधील दामू नगर झोपडपट्टी
* भांडुप येथील टेंभीपाडा वस्ती
* घाटकोपरमधील जागृती नगर, भटवाडी, कामराज नगर
* ठाण्यामधील अंबिका नगर
संकेत सबनीस,