काश्मीर व हिमाचल प्रदेशातून उच्च प्रतीचा चरस मुंबईत आणून विकणाऱ्या हाजी अब्दुल रेहमान शेख याची राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) चौकशी करणार आहे. हाजी हा काश्मीरचा रहिवासी आहे. तो दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आहे का, चरस विक्रीआडून तो दहशतवादी संघटनांना आर्थिक मदत करतो का, याबाबत एटीएसकडून खातरजमा केली जाईल, अशी माहिती मिळते. हाजीला अमली पदार्थविरोधी पथकाच्या वरळी कक्षाने रविवारी नागपाडा येथून अटक केली. त्या वेळी त्याच्याकडे उच्च प्रतीचा २१ किलो चरस हस्तगत करण्यात आला.

हाजीसोबत मुंबईतील टॅक्सीचालक इरफान कुरेशी यालाही पथकाने अटक केली. इरफान हाजीचा ठरलेला टॅक्सीचालक आहे. प्रत्येक वेळी काश्मीर, हिमाचल प्रदेशातून आणलेल्या चरसच्या वितरणासाठी हाजीकडून इरफानच्या टॅक्सीचा वापर केला जातो. वरळी शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक निनाद सावंत आणि पथकाला हाजी चरसची मोठी खेप घेऊन मुंबईत उतरल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार नागपाडा परिसरात सापळा रचून या दोघांना ताब्यात घेण्यात आले.

दोघांकडून तब्बल २१ किलो उच्च प्रतीचा चरस साठा सापडला. भारतीय बाजारात त्याची किंमत ८३ लाखांच्या आसपास असावी, असे सांगण्यात आले. टॅक्सीचालक इरफान हाजीचा जुना साथीदार असून दरवेळी त्याने चरस वितरणासाठी हाजी इरफानची टॅक्सी वापरल्याचे तपासात उघड झाले आहे. या वेळी दोघे चरस वितरण करीत असताना सावंत यांच्या पथकाने त्यांना अटक केली. २०१० साली हाजीला वरळी शाखेनेच अटक केली होती. वरळी कक्षातील अधिकाऱ्यांचा अचूक तपास आणि भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयाने हाजीला दहा वर्षे शिक्षा ठोठावली, मात्र २०१४ मध्ये हाजीने उच्च न्यायालयात शिक्षेला आव्हान दिले. त्या वेळी उच्च न्यायालयाने हाजीचा जामीन अर्ज मंजूर केला होता.