मुंबईत शहरातील गटारे आणि नाले सफाई व्यवस्थित झाली नसल्यानेच पावसाचे पाणी तुंबून राहते असा आरोप विरोधकांकडून कायमच केला जातो. यासाठी महापालिकेला टार्गेटही केले जाते. मात्र, ही बाब शंभर टक्के खरी असल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे मुंबई तुंबण्यास महापालिकेचा ढिसाळ कारभारच कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

प्रतितास २५ मिमी इतक्या प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी वाहून नेण्याची मुंबईतील गटारांची क्षमता आहे. मात्र, ही गटारे गाळाने भरलेली असल्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने वाहून नेऊ शकत नाहीत, अशी धक्कादायक बाब कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. विधानसभेत आज हा अहवाल मांडण्यात आला होता. यातून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनातील त्रुटी समोर आल्या.

कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मुंबईत बांधण्यात आलेली गटारे ही उतरल्या स्वरुपात नाहीत तर सपाट पद्धतीने बांधण्यात आली आहेत. ज्यावेळी अरबी समुद्राला भरती आणि ओहोटी येते तेव्हा समुद्रातून येणारी घाण आणि गाळ या गटारांमध्ये साचून राहतो. तसेच शहरांत साचलेले पाणी समुद्रात टाकणारी गटारे समुद्र पातळीच्या बरीच खाली आहेत.

त्याचबरोबर हे पाणी बाहेर काढणाऱ्या ४५ गटारांपैकी केवळ तीनच गटारांना दरवाजे बसवण्यात आल्याने ते बंद केल्यास भरतीचे पाणी आत शिरण्यापासून नियंत्रण करता येते. काही मोठ्या नाल्यांमधून केबल्स आणि छोट्या पाईपलाईन जात असल्याने त्याचाही पाणी वाहून जायला अडथळा ठरत असून नाल्यांच्या दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे.

त्याचबरोबर छोटे नाले अयोग्य जागी असून प्रभावी नाहीत. या नाल्यांची रचनाही अयोग्य असल्याने पाणी योग्य प्रकारे वाहून जाऊ शकत नाही. शहरात अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडूनही त्यावर ठोस उपाय योजना करण्यात आलेल्या नाहीत. यासाठी जिओग्राफिकल सर्वे ऑफ इंडियाने महापालिकेला उपयोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या मात्र, महापालिकेने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याचेही कॅगच्या अहवालात म्हटले आहे.