नव्या बंबार्डिअर गाडय़ांचे मुंबईतील आगमन रखडले
तामिळनाडूला बसलेल्या ईशान्य मान्सूनच्या फटक्याने चेन्नईतील जनजीवन विस्कळीत झाले असताना या पावसाचा मोठा फटका मुंबईकरांनाही बसला आहे. मुंबईच्या उपनगरीय गाडय़ांच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या चार नव्या बंबार्डिअर गाडय़ा नोव्हेंबर महिन्यात चेन्नईहून मुंबईत येणे अपेक्षित होते. मात्र, या पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाल्याने नोव्हेंबर महिन्यातील पहिली गाडी नुकतीच चेन्नईवरून रवाना झाली आहे. परिणामी या नव्या गाडय़ांच्या येण्याचे वेळापत्रकही बिघडले आहे.
एमयुटीपी-२ या प्रकल्पांतर्गत मुंबईच्या उपनगरीय ताफ्यात ७२ बंबार्डिअर गाडय़ा दाखल होणार आहेत. या सर्व गाडय़ा पश्चिम रेल्वेकडे जाणार असून पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स गाडय़ा मध्य रेल्वेच्या ताफ्यात येणार आहेत. या गाडय़ा चेन्नईतील इंटिग्रेटेड कोचिंग फॅक्टरीत (आयसीएफ) तयार होत आहेत. आतापर्यंत महिन्याला चार या प्रमाणे वेळापत्रकाप्रमाणे १० गाडय़ा पश्चिम रेल्वेवर आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यातही चार गाडय़ा येणे अपेक्षित होते.
मात्र, ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये सक्रिय झाल्यानंतर तेथे पावसाने थैमान घातले होते. परिणामी चेन्नईतही पूरसदृश परिस्थिती होती. त्यामुळे १७ नोव्हेंबपर्यंत आयसीएफमधून बंबार्डिअर गाडी रवाना झाली नव्हती. पहिली गाडी १७ नोव्हेंबर रोजी रवाना झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. पुढील १०-१२ दिवसांत उर्वरित तीन गाडय़ा मुंबईत दाखल होणे कठीण असल्याचेही त्यांनी सांगितले.

चेन्नईत अनेक ठिकाणी पाणी साचले होते. कोचिंग फॅक्टरीही त्याला अपवाद नव्हती. बंबार्डिअर गाडय़ांच्या विद्युत प्रणालीत पाणी गेल्यास अडचण निर्माण होऊ शकते. असे झाल्यास या नव्या गाडय़ा मुंबईत येण्यास अधिक कालावधी लागेल.
मुंबई रेल्वे विकास
प्राधिकरणाचे अधिकारी