नमिता धुरी

टाळेबंदीमुळे गमावलेला रोजगार, ऑनलाइन शिक्षणासाठी सुविधांची कमतरता, इत्यादी कारणांमुळे सर्वसामान्य कु टुंबांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. एक वर्ष थांबून, पैशांची जमावाजमव करून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

विरारला राहणाऱ्या प्रणय पाटील याने कीर्ती महाविद्यालयातून कला शाखेतील पदवीचे पहिले वर्ष पूर्ण केले. पण भ्रमणध्वनी नसल्याने त्याला दुसऱ्या वर्षांच्या ऑनलाइन तासिकांना हजर राहता येत नाही. वांद्रे येथे नोकरी करणाऱ्या त्याच्या वडिलांना रेल्वेने जाण्याची परवानगी नसल्याने आठ महिने कामावर जाता आले नाही. त्यामुळे पगार बंद आहे. परिणामी, महाविद्यालयाचे शुल्क भरणे, ऑनलाइन शिक्षणासाठी भ्रमणध्वनी खरेदी करणे प्रणयला शक्य नाही. त्याने आता वसई येथे एका कॅमेरा कंपनीत नोकरी स्वीकारली आहे. शिक्षण पुढील वर्षीच सुरू करावे लागेल, अशी खंत त्याने व्यक्त केली.

अंधेरीच्या तेजश्री बिस्वलकर हिने डहाणूकर महाविद्यालयातून वृत्तविद्येची (जर्नालिझम) पदवी घेतली. त्यानंतर तिला चेन्नईच्या महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घ्यायचा होता. तिथे साडेचार लाख रुपये शुल्क आहे. टाळेबंदीत अर्धा महिना उलटून गेल्यावर वडिलांचा पगार येऊ लागला, तोही पूर्ण नाही. त्यामुळे प्रवेश घेता आला नाही. मुंबई विद्यापीठातही प्रवेश सुरू झाले होते. मात्र, पदवीचा निकाल लागला नव्हता. ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी आल्याने उत्तीर्ण होण्याबाबत शंका होती. त्यामुळे पदव्युत्तर अभ्यासक्रमाला आधीच प्रवेश घेऊन ठेवणे तेजश्रीला योग्य वाटले नाही. आपण पुढील वर्षी प्रवेश घेणार असल्याचे तिने सांगितले.

पदवीचा निकाल लागल्यानंतर काही महिने नोकरी करत, थोडेसे पैसे साठवून समाजकार्यात पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा, असे मालाडच्या हर्षदा चव्हाण हिने ठरवले होते. पण पदवीचा निकाल आणि नोकरी दोन्ही उशिरा मिळाले. निर्मला निके तन महाविद्यालयात ३५ हजार रुपये किं वा ‘टीस’मध्ये दोन लाख रुपये शुल्क भरावे लागेल. त्यामुळे यंदा प्रवेश न घेता नोकरी करून, पैसे साठवून पुढील वर्षी प्रवेश घेण्याचे हर्षदाने ठरवले आहे.

कर्ज मिळाले तरच प्रवेश

कांदिवलीच्या आकाश तिवारीने अर्धवेळ नोकरीतून मिळालेल्या पैशांच्या आधारे मुंबई विद्यापीठातून समाजकार्यातील पदव्युत्तर पदवीचे पहिले वर्ष पूर्ण केले. मात्र यंदाच्या सुटीत काहीच काम मिळाले नाही. आकाशच्या रिक्षाचालक वडिलांचाही धंदा नीटसा होऊ शकला नाही. तो सध्या ऑनलाइन तासिकांना हजर राहतो. पण त्याला ४० हजार रुपये शुल्क भरून प्रवेश घेता आलेला नाही. विद्यापीठाने सवलत दिली तरी किमान २० हजार रुपयांचा पहिला हप्ता भरावा लागेल. त्यामुळे आता कर्ज मिळाले तरच प्रवेश घ्यायचा असे त्याने ठरवले आहे.