01 October 2020

News Flash

ब्रिटिशकालीन आठ भूमिगत टाक्या गायब

पालिकेच्या उदासीनतेमुळे टाक्यांवर अतिक्रमण

पालिकेच्या उदासीनतेमुळे टाक्यांवर अतिक्रमण

मुंबईची जडणघडण करताना आगीच्या दुर्घटनांची शक्यता लक्षात घेऊन तात्काळ पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ब्रिटिशांनी शहरामध्ये ठिकठिकाणी बांधलेल्या ६६ पैकी आठ टाक्या गायब झाल्या आहेत. तर काही टाक्यांवर अतिक्रमण झाले असून काही टाक्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या टाक्यांतील पाण्याचा अग्निशमनासाठी आजही वापर करता आला असता, परंतु पालिकेने हेळसांड केल्यामुळे टाक्यांची दुरवस्था झाली आहे.

मुंबईचा विकास करताना ब्रिटिशांनी कुलाबा ते धारावी परिसरात पाण्याच्या तब्बल ६६ भूमिगत टाक्या बांधल्या होत्या. या टाक्यांची क्षमता प्रत्येकी २.५० लाख लिटर इतकी होती. काही टाक्यांमध्ये उतरण्यासाठी शिडीची व्यवस्थाही करण्यात आली होती. आसपासच्या परिसरात आग लागल्यानंतर या टाक्यांतील पाण्याचा वापर अग्निशमनासाठी केला जात होता. ब्रिटिश भारतातून गेल्यानंतर या पाण्याच्या टाक्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. सध्या या टाक्या पालिकेच्या जलविभागांतर्गत असलेल्या तातडीच्या दुरुस्ती विभागाच्या अखत्यारीत आहेत. गेल्या काही दशकांमध्ये मुंबईत झालेला विकास आणि पालिकेने केलेले दुर्लक्ष यामुळे या ६६ पैकी आठ टाक्या गायब झाल्या आहेत. वाडीबंदर पोलीस वसाहत, बाबुला टँक म्युनिसिपल उद्यान, मुंबादेवी म्युनिसिपल उद्यान – २, कस्तुरबा रुग्णालय परिसर, लालबागमधील गणेशगल्ली मैदान, शिवडीचे क्षयरोग रुग्णालय, पश्चिम रेल्वेवरील दादर मालवाहतूक यार्ड, धारावीमधील म्युनिसिपल कॉलनी येथील टाक्या गायब झाल्या असून त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच पोलीस आयुक्तालयासह अन्य पाच ठिकाणच्या टाक्यांपैकी काहींवर अतिक्रमण झाले आहे, तर काही तुटल्या आहेत. या टाक्यांचा माग शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक आणि सेंट झेविअर्स महाविद्यालयातील प्राध्यापक अवकाश जाधव यांनी घेतला असता ही बाब उघडकीस आली.

पालिकेने आतापर्यंत या टाक्यांकडे दुर्लक्ष केले आहे. पुरातन वास्तू म्हणून या टाक्यांना दर्जा द्यायला हवा. पालिकेने तातडीने या टाक्यांची दुरुस्ती करून त्यांचे जतन करावे. मुंबईच्या नव्या विकास आराखडय़ात त्यांची नोंद करावी. इमारत आणि प्रस्ताव विभागानेही या टाक्यांची नोंद घ्यावी, अन्यथा विकासाच्या नावाखाली या टाक्यांवर अतिक्रमण होईल आणि त्या कायमच्या काळाच्या पडद्याआड जातील.

– प्रा. अवकाश जाधव, शिवसेना नगरसेवक

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 12:18 am

Web Title: eight british underground tanks missing
Next Stories
1 पनवेल महापालिका स्थापनेचा घोळ
2 मंत्रालय परिसरातील जागा पक्षांना सोडवेना
3 भिवंडीत चालत्या रिक्षाने घेतली पेट, ९ प्रवासी जखमी
Just Now!
X