राज्यातील बहुतेक जिल्ह्य़ांतील शाळांमध्ये पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून भरले असून, जवळपास ८५ टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती साधारण ३० टक्के होती.

मुंबई शहर, उपनगर, पुणे शहर यांसह काही भागांतील शाळा अद्याप सुरू झाल्या नसल्या तरी आता राज्यातील अनेक भागांमधील शैक्षणिक परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास २३ नोव्हेंबरपासून परवानगी दिल्यानंतर दुसऱ्या टप्प्यांत २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार बहुतेक जिल्ह्य़ांतील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा सुरू झाल्या. प्रामुख्याने ग्रामीण भागांतील शाळा सुरू झाल्या आहेत. राज्यातील एकूण २८ हजार ४७३ शाळांमधील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. पहिल्याच दिवसापासून पाचवी ते आठवीच्या वर्गात विद्यार्थ्यांची जवळपास ३० टक्के उपस्थिती होती. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांत विद्यार्थ्यांची उपस्थिती अधिक आहे. ठाणे जिल्ह्य़ाच्या क्षेत्रातील शाळा आणि नागपूर येथील शाळांमध्ये मात्र पहिल्या दिवशी साधारण ९ टक्के उपस्थिती होती.

साडेसहाशे शिक्षक, कर्मचाऱ्यांना करोना शाळा सुरू करण्यापूर्वी सर्व शिक्षकांची करोना चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले. आतापर्यंत शाळा सुरू झालेल्या जिल्ह्य़ातीलही अनेक शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी होऊ शकलेली नाही. पाचवी ते आठवीच्या वर्गात शिकवणाऱ्या १ लाख ४५ हजार ६७ शिक्षकांपैकी ९७ हजार २२३ शिक्षकांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ४९३ शिक्षकांना करोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले. एकूण २८ हजार २८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी २१ हजार २१३ कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी १६१ कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे.

मुंबईत शाळा बंदच

मुंबई शहर आणि उपनगरातील शाळा सुरू करण्यास पालिकेने अद्यापही परवानगी दिलेली नाही. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होऊन दोन महिने झाले. मुंबई वगळता बहुतेक सर्व भागांत आता पाचवी ते बारावीचे वर्ग भरत आहेत. मात्र, मुंबई पालिकेच्या क्षेत्रातील कोणतीही शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शाळा कधी सुरू होणार याबाबतही पालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पुणे आणि ठाणे महापालिका क्षेत्रातील अनेक शाळा अद्याप सुरू झालेल्या नाहीत. पुणे पालिकेच्या क्षेत्रातील शाळा १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.

शाळा कुठे सुरू? शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार नगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, नागपूर, नांदेड, नाशिक, पालघर, सातारा, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, पुणे आणि ठाणे या जिल्हांतील शाळा सुरू झाल्या. यातील चंद्रपूर येथील सर्व म्हणजे शंभर टक्के शाळा सुरू झाल्या आहेत.