रखडलेली स्मारके मार्गी लावण्यासाठी भाजपमंत्री सरसावले

निवडणुकांच्या तोंडावर समाजातील जातीपातींना आपलेसे करण्यासाठी स्मारकांच्या राजकारणाला वेग आला असून निवडणुकीपूर्वी अशा स्मारकांचा प्रस्ताव मंजूर करणे, जागा निश्चित करणे ही कामे पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपचे मंत्री या विषयांत जातीने लक्ष घालत असून संबंधित विभागांशी बैठका घेऊन  आपल्या भागातील स्मारकांची कामे मार्गी लावण्यासाठी ते आग्रह धरत आहेत.

राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विषय ऐरणीवर आहे. याबरोबर राज्यातील लिंगायत, मांग अशा विविध समाजघटकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असलेल्या त्यांच्या समाजातील थोर व्यक्तींच्या स्मारकाचे प्रश्न प्रलंबित आहेत. घोषणा झाल्या पण अंमलबजावणी विविध पातळ्यांवर रखडली आहे. आगामी निवडणुकीपूर्वी या स्मारकांचा प्रश्न मार्गी न लावल्यास नाराजी निर्माण होऊ शकते याची जाणीव झाल्याने या समाजघटकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजप सरकारने स्मारकांच्या कामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या दोन दिवसांत संगमवाडी पुणे येथे प्रस्तावित असलेले क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे स्मारक, मंगळवेढय़ातील महात्मा बसवेश्वर स्मारकाबाबत बैठका झाल्या. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी लहूजी वस्ताद साळवे स्मारकाबाबत बैठक घेतली. त्याच्या भूसंपादनाचे काम अडले आहे. २२ हजार चौरस फुटाच्या भूसंपादनासाठी ७४ कोटी रुपयांची गरज आहे. यापैकी १६ कोटी ४६ लाख रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहेत. नियमानुसार ३० टक्के रक्कम जमा करावयाची असल्याने उर्वरित ५ कोटी रुपयांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे कांबळे यांनी सांगितले.

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लिंगायत समाजाचे दैवत महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने बैठक घेतली. या स्मारकासाठी र्सवकष आराखडा लवकरात लवकर सादर करावा, फेब्रुवारी २०१९च्या सुरुवातीला या स्मारकाचे भूमिपूजन करता येईल यादृष्टीने कामाला वेग द्यावा, असा आदेश मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिला.