25 September 2020

News Flash

पावसात विजेचे रडगाणे!

गेल्या महिन्यात बेस्ट उपक्रमातील एकूण ४६६ कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले होते.

वीज खंडित होण्याच्या घटनांत वाढ; दहा दिवसांत ‘बेस्ट’कडे ५००हून अधिक तक्रारी

टाटाचा वीजेचा मनोरा कोसळल्यामुळे उपनगरात गेले काही दिवस सुरू असलेला विजेचा गोंधळ ताजा असतानाच पावसाच्या संततधारेमुळे बेस्ट उपक्रमाच्या वीजपुरवठय़ावरही पावसाचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दहा दिवसांत वीज पुरवठा खंडित होण्याच्या तब्बल ५०० हून अधिक तक्रारी बेस्टकडे आल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे बेस्टकडील कर्मचाऱ्यांची ‘पॉवर’ या तक्रारींचा निपटारा करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे दुरुस्तीला विलंब होत असून रहिवाशांना दिर्घकाळ अंधाराशी सामना करावा लागतो आहे.

मान्सूनपूर्वी बेस्ट उपक्रमाचा वीज पुरवठा विभाग सज्ज असल्याचा दावा केला गेला होता. मात्र, संततधार पडणाया पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी वाढत आहे. पावसात पाणी जमिनीत झिरपल्याने वीज पुरवठा करणाऱ्या वायरला याचा फटका बसत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढत आहे.

गेल्या महिन्यात बेस्ट उपक्रमातील एकूण ४६६ कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले होते. यात वीज पुरवठा विभागातील तब्बल ५८ कर्मचाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे वीजपुरवठा विभागाला कर्मचाऱ्यांची टंचाई जाणवत आहे. याचा परिणाम जाणवत असल्याचा आरोप गुरुवारी झालेल्या बैठकीत करण्यात आला.

पावसाळ्यापूर्वी विविध कामांसाठी रस्ते खोदले जातात, यात वायर कापल्या जातात. पावसाळ्यात जमिनीत झिरपणारे पाणी एखाद्या वायरमध्ये गेल्यास वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. भेंडीबाजार, अभ्युदयनगर, अ‍ॅन्टॉप हिल परिसरात या तक्रारी सर्वाधिक असल्याचे ‘बेस्ट’मधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पावसात वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २३ गाडय़ांसह कर्मचाऱ्यांची तुकडी सतत रस्त्यावर असते. बेस्ट उपक्रमातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांना वीज पुरवठा विभागाच्या मदतीसाठी कामात सहभागी करून घेण्यात आले आहे.

– डॉ. जगदीश पाटील, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम

पश्चिम उपनगरात विजेचा लपंडाव सुरूच

ऐरोली येथे टाटा पॉवरचा वीजेचा मनोरा मंगळवारी सायंकाळी कोसळल्यानंतर मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू झालेला वीजेचा लपंडाव अद्याप थांबलेला नसून याचा फटका सलग तिसऱ्या दिवशीही उपनगरवासियांना बसला. मनोरा कोसळल्याने कांदिवलीसह अन्य उपनगरातील काही भागात टप्प्या-टप्प्याने दोन ते तीन तासाचे वीजेचे भारनियमन सुरू करण्यात आले. याचा फटका सामान्य नागरिकांबरोबरच शाळा, महाविद्यालये, रूग्णालये यांना बसला असून या समस्येबाबत वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर व रिलायन्स एनर्जी या कंपन्यांनी आपापल्या ‘ट्विटर’ खात्यावरून निवेदने प्रसिद्ध केली आहेत. मात्र ही घोषणा अनेक सामान्य नागरिकांपर्यंत पोहचली नसून ‘ट्विटर’ वापरणाऱ्या मुंबईकरांनी मात्र कंपन्यांवर या समस्येबाबत आगपाखड केली.

मंगळवारी सायंकाळी ऐरोली येथील टाटा पॉवरचा २६ क्रमांकाचा वीजेचा मनोरा कोसळला. हा मनोरा कोसळल्यानंतर  मुंबईत सामान्यांपर्यंत वीज पोहचवणाऱ्या रिलायन्स एनर्जीला वीज पुरवठा करण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे, रिलायन्स एनर्जीने उपनगरात टप्प्याटप्प्याने भारनियमन करण्यास सुरूवात केली. याचा फटका कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड यांसह अन्य पश्चिम उपनगरांना बसला आहे. हा भारनियमनाचा लपंडाव मात्र, मंगळवारी सायंकाळी सुरू झाल्यानंतर अद्याप थांबलेला नसून तो पुढील तीन ते चार दिवस चालण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी, याबाबत अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही उपनगरातील रूग्णालये, महाविद्यालये, खाजगी व सरकारी कार्यालये बाधित झाली. याबाबत बोलताना कांदिवली येथील रहिवासी बाळकृष्ण ऐर म्हणाले की, आमच्या येथे वीजेचे भारनियमन सुरू असून हा प्रकार नेमका का झाला आहे, हे कळण्यास मार्गच नाही. याबाबत संबंधित कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना सूचना देण्याची आवश्यकता होती.

ट्विटरवर नाराजी

या समस्येनंतर टाटा पॉवर व रिलायन्स एनर्जीने आपापल्या ट्विटर खात्यावरून निवेदने प्रसिद्ध करत झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त केली आहे. पण, गुरूवापर्यंत त्यांच्या ट्विटर खात्यावर हीच निवेदने असल्याने वीज पूर्ववत केव्हा होणार याचे उत्तर मिळू शकलेले नाही. तसेच, उपनगरातील अनेक ग्राहक ट्विटर वापरत नसल्याने त्यांच्यापर्यंत वीज का गेली हा संदेश पोहचलेला नसून जे मुंबईकर ट्विटर वापरत आहेत, त्यांनी मात्र या कंपन्यांच्या समस्येवर ‘रिट्विट’करून नाराजी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 5:10 am

Web Title: electric issue in mumbai electric issue in mumbai
Next Stories
1 मुंबईतील ६८ टक्के डॉक्टर तणावाखाली
2 तिकीट दलाल कारवाईत ‘परे’ अग्रेसर
3 मध्य रेल्वेवरील जाहिरातींच्या उद्घोषणांतून प्रवाशांची सुटका
Just Now!
X