मागील खर्चाचा ताळमेळ म्हणून राज्यातील वीजग्राहकांकडून वसूल करण्यात येत असलेल्या रकमेची वसुली पूर्ण झाल्याने राज्यातील वीजग्राहकांच्या दरात एप्रिल महिन्यात कपात करण्यात आल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. घरगुती ग्राहकांना २९ पैसे ते ४९ पैसे प्रति युनिट तर औद्योगिक ग्राहकांचा दर ५५ पैसे ते ५८ पैसे प्रति युनिटने कमी होणार आहे.
घरगुती ग्राहकांना शंभर युनिटपर्यंतच्या वीजवापरासाठी ३.६५ रुपये प्रति युनिट इतका वीजदर मार्चमध्ये लागू आहे. एप्रिलमध्ये तो ३.३६ पैसे प्रति युनिट इतका कमी होईल. १०१ ते ३०० युनिटपर्यंतच्या वीजवापरासाठी सध्या ६.५४ रुपये प्रति युनिट आकारले जातात. एप्रिलमध्ये तो ४९ पैशांनी कमी होऊन ६.०५ रुपये प्रति युनिट इतका असेल. वाणिज्यिक ग्राहकांच्या वीजदरात ९२ पैसे ते १.६३ रुपये प्रति युनिट असा दिलासा मिळाला. तो आता १.४५ रुपये ते २.५८ रुपये इतका असेल. राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदराचा प्रस्ताव आहे. त्यानुसार नवीन वीजदर लागू होईपर्यंत हे वीजदर राहतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.