जगातील सर्वात लठ्ठ महिला म्हणून चर्चेत आलेल्या इमान अहमद हिचे वजन अवघ्या महिन्याभरात तब्बल १२० किलोंनी कमी झाले आहे. त्यामुळे आता इमानला स्वत:हून बसताही येऊ लागले आहे. मुंबईतील सैफी रुग्णालयात तिला उपचारांसाठी दाखल करण्यात आले तेव्हा तिचे वजन ५०० किलो इतके होते. मात्र, आता काही शस्त्रक्रियांनंतर इमानचे वजन ३८० किलोपर्यंत खाली आले आहे. इमान उपचारांना देत असलेल्या या प्रतिसादामुळे सैफी रुग्णालयातील डॉक्टरही अवाक झाले आहेत. त्यामुळे इजिप्तच्या इमान अहमदची जगातील सर्वाधिक वजनदार महिला ही ओळख आता पुसली जाणार आहे.

दरम्यान, आता डॉक्टर इमानच्या पुढील टप्प्यातील बेरयाट्रिक या महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेच्या तयारीला लागले आहेत. या शस्त्रक्रियेत इमानच्या पोटाचा काही भाग कापण्यात येणार असून त्यामुळे पुढील सहा महिन्यात इमानचे २०० किलो वजन कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मागील महिन्यात तिच्यावर सर्जरी करून तिचे वजन ३० किलोपर्यंत घटवण्यात आले होते.

अकराव्या वर्षांपासून अंथरुणाला खिळल्यानंतर दैनंदिन काम करण्यासाठीही तिला आई आणि बहिणीवर अवलंबून राहावे लागे. तिला रोजची स्वच्छता, जेवण झोपलेल्या अवस्थेतच करावे लागते. अशा परिस्थितीतही इमानची बहीण शाहिमा हिने आशा सोडली नाही. तिने इजिप्तमधील अनेक डॉक्टरांच्या भेटी घेऊन इमानचे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले पण या फारसे यश आले नाही. अखेर तिच्या आईने तिला उपचारासाठी भारतात आणले.

इमान हिला अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयविकार, थायरॉइड यांसारखे अनेक विकार जडले आहेत. त्यामुळे तिच्यावर उपचार करताना डॉक्टरांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या तिच्या अनेक सर्व आजारांवर नियंत्रण आणण्याचे काम डॉक्टर करणार आहेत. शस्त्रक्रिया करून इमान हिच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी केले जाईल. यातून पुढील ४ ते ५ महिन्यांत तिचे वजन ८० ते १०० किलोने कमी होईल, असा दावा डॉ. मुझ्झफर लकडावाला यांनी केला होता.

 

काय आहे बेरियाट्रिक शस्त्रक्रिया ?

बेरियाट्रिक शस्त्रक्रियेत शरीरातील आतडे आणि जठरांचा आकार कमी केला जातो. त्याकरिता सर्वप्रथम रुग्णाचे मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे आटोक्यात आणले जाते. अनेकदा जास्त वजन असलेल्या रुग्णांवर प्रथम छोटी शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे रुग्ण कमी खातो आणि वजन कमी होते.रुग्णाला प्रोटीन, कॅल्शिअम आदी घटक औषधांच्या स्वरूपात दिले जातात. यात सहा महिने रुग्णाचे निरीक्षण केले जाते. शस्त्रक्रियेला योग्य प्रतिसाद मिळाला तर सहा महिन्यांत रूग्णाचे वजन ५० किलोने कमी होते. यानंतर स्लिव गॅस्ट्रोमीसारखी मोठी शस्त्रक्रिया करणे योग्य ठरते. ५०० किलो वजनाच्या रुग्णाची बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करणे अतिशय धोकादायक आहे. मात्र रुग्णाने शस्त्रक्रियेला चांगला प्रतिसाद दिला तर वर्षांला कमाल १०० किलो वजन कमी करणे शक्य आहे.