संदीप आचार्य

राज्यातील खासगी आणि सरकारी आरोग्य यंत्रणा सध्या करोना रुग्णांवरील उपचारांशी झगडत असल्यामुळे बिगरकरोना रुग्णांची अक्षरश: वाताहत झाली आहे. करोना लागण नसलेल्या तसेच अन्य आजारांसाठी उपचाराची गरज असलेल्या शेकडो रुग्णांना

औषधासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात धावपळ करावी लागत आहे. मूत्रपिंड, ह्रदयविकार आणि नेत्रविकाराच्या रुग्णांची गेल्या महिन्याभरात सर्वाधिक फरफट झाली आहे.

टाटा रुग्णालयापासून जे.जे. रुग्णालयापर्यंत सर्वानी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर पूर्वनियोजित शस्त्रक्रिया रद्द केल्या. तसेच काही शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या.  गेल्या महिन्यापासून मूत्रपिंडावरील शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असलेल्या रुग्णांपुढे आता करायचे काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. उपनगरांतील रुग्णालयातील डॉक्टर आपल्याकडे आलेल्या रुग्णांना केईएम, शीव व नायर रुग्णालयात पाठवून देतात. तेथे गेल्यानंतरही रुग्णांना आवश्यक असलेला उपचार होत नाही. मुंबईतील १७ हजार नर्सिग होम्सपैकी फारच थोडी सध्या सुरू आहेत.  काही रुग्णालयात करोना रुग्ण सापडल्यामुळे तेथे नव्या रुग्णांचा समावेश केला जात नाही, अशी परिस्थिती आहे.

मोठी रुग्णालये सध्या सरसकट बंद करणे अयोग्य आहे. करोना व्यतिरिक्त अन्य आजाराच्या अथवा शस्त्रक्रिया खोळंबलेल्या रुग्णांवर उपचार होणे आवश्यक असल्याचे लीलावती रुग्णालयातील मधुमेहतज्ज्ञ डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले.

अनेक लोकप्रतिनिधींच्याही अशाच तक्रारी असून महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, करोना प्रमाणेच अन्य आजारांच्या रुग्णांनाही पालिका रुग्णालयात उपचार देण्यात येतात. काही तक्रारी नक्कीच आहेत. बाह्य़ रुग्ण वा अपघात विभागात आलेल्या प्रत्येक रुग्णाला उपचार मिळालेच पाहिजे. बहुतेक नियोजित शस्त्रक्रिया रद्द केल्या, त्याही आता सुरू कराव्या लागतील. तसेच केईएम, शीव व नायर या तिन्ही रुग्णालयात बाह्य़ रुग्ण आणि अपघात विभागातील सर्व डॉक्टरांना करोना संरक्षित पोषाख व पुरेसे मास्क तात्काळ देण्यात येतील. जेणे करून कोणत्याही रुग्णाला तपासण्यात अडचण येणार नाही. याची अंमलबजावणी तातडीने होईल, असेही काकाणी यांनी सांगितले. पालिकेच्या अन्य प्रमुख उपनगरीय रुग्णालयातही याची लवकरच अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

परिस्थिती काय?

करोनाचा प्रसार थांबावा यासाठी केंद्राने टाळेबंदी जाहीर केली. त्यानंतर खासगी आणि शासकीय पातळीवर सर्व आरोग्य यंत्रणेने करोना बाधितांसाठी कंबर कसली. पण याचा परिणाम इतर आजार असलेल्या रुग्णांवर झाला. मूत्रपिंडविकार, ह्रदयविकार, डोळ्याचे रुग्ण आणि गर्भवतींना डॉक्टर मिळणे अवघड झाले आहे.

करोना नसलेल्या प्रत्येक रुग्णाला तात्काळ तपासून योग्य उपचार मिळाले पाहिजे, घरात वृद्ध माणूस पडून हाड मोडले, मधुमेहाच्या रुग्णाला जखम झाली, ह्रदयविकाराच्या रुग्णांची प्रकृती बिघडली, तर त्यांनी जायचे कुठे? डॉक्टरांना जर आवश्यक वाटले तर त्यांनी करोना चाचणी करावी व लागण आढळल्यास संबंधित रुग्णालय किंवा विभागात रुग्णांना उपचारासाठी दाखल करावे.

–  डॉ. शशांक जोशी, मधुमेह तज्ज्ञ.