साकीनाका येथील फरसाण कारखान्यातील आगीच्या घटनेनंतर महानगरपालिकेने उपाहारगृहांचा उपयोग निवासासाठी करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या अटीचे पालन करत नसलेल्या उपाहारगृह तसेच पबचे परवाने रद्द करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. मात्र यामुळे शहरातील अनेक उपाहारगृहांची अडचण होण्याची शक्यता आहे.

शहरात अनेक उपाहारगृहात राज्याबाहेरील कामगार काम करतात. वेतन तुटपुंजे असूनही राहण्याची व खाण्याची सोय होत असल्याने अनेक जण ही सोयीची नोकरी धरून ठेवतात. त्याचप्रमाणे पहाटेपासून काम असल्याने उपाहारगृह मालकही कामगारांना पथारी पसरण्याची परवानगी देतात. मात्र साकीनाका येथील फरसाण कारखान्यात रात्री झोपलेल्या कामगारांच्या आगीमुळे मृत्यू झाल्याने महानगरपालिकेने उपाहारगृहांवरील र्निबधांची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. स्वयंपाकगृह असलेले उपाहारगृह किंवा आस्थापनांचा वापर खाद्यपदार्थ बनवण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी करता येत नाही, अशी अट घालून महापालिकेकडून परवानगी दिली जाते. त्यामुळे उपाहारगृहांमध्ये कामगारांच्या निवासाची व्यवस्था करणे बेकायदा असल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. याबाबत शहरातील सर्व उपाहारगृहांना तातडीने कळवावे, असे आदेश आयुक्त अजोय मेहता यांनी गुरुवारी झालेल्या मासिक आढावा बैठकीत दिले. तसेच याची अंमलबजावणी न करणाऱ्या उपाहारगृहांचा परवाना तात्काळ रद्द करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या.

व्यावसायिक जागेचा वापर निवासासाठी करता येणार नसल्याचे उपाहारगृह मालकांना माहिती असले तरी ते व्यवहार्य नसल्याचे आहार संघटनेच्या सदस्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक उपाहारगृहे सकाळी सात वाजण्याआधी सुरू होतात. त्यासाठी साडेतीन-चार वाजल्यापासून काम करावे लागते. एवढय़ा लवकर उपनगरांमधून कामगार कसे पोहोचणार? त्याचप्रमाणे बहुतांश उपाहारगृह दोन वेळेत चालतात. आगीच्या दुर्घटनेनंतर कडक कारवाई करत असल्याचे दाखवण्यासाठी पालिका वेगवेगळ्या सूचना करत आहेत, मात्र त्यामुळे व्यावसायिकांना उपाहारगृह चालवणे कठीण होईल, असे एका हॉटेलमालकाने सांगितले.

शहरातील दर्जेदार उपाहारगृहे रात्री कुलूप लावून बंद केली जातात. तिथे ही समस्या येत नाही. मात्र गरीब वस्त्यांमध्ये तसेच लहान जागेत व्यवसाय करणाऱ्यांना ही समस्या जाणवू शकेल, असे आहार संघटनेचे सदस्य व माजी अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी सांगितले.