देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात यंदापासून प्राचीन काळातील शोधगाथेचाही समावेश करण्यात आला असून ऋग्वेदामधील गुरुत्वाकर्षणाचा उल्लेख, अगस्ती ऋषींनी प्राणवायूचा शोध लावला, वैदिक काळातील विमान शास्त्र अशा घटकांचा समावेश असलेले पुस्तक विद्यार्थ्यांना अभ्यासण्यासाठी देण्यात येणार आहे. हे पुस्तक रद्द करण्यात यावे अशी मागणी अभ्यासकांकडून करण्यात येत आहे.

वैदिक काळातील शोधांबाबत मंत्र्यांकडून करण्यात येणाऱ्या विधानांनी अधूनमधून वाद उद्भवत असताना आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) अभियांत्रिकी शाखेच्या अभ्यासक्रमात अशा शोधांचा समावेश केला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांना वैदिक काळातील शोध, ऋषी-मुनींचे सिद्धान्त यांचाही अभ्यास करावा लागणार आहे.

यंदा परिषदेने अभियांत्रिकी शाखेसाठी देशभर एकच अभ्यासक्रम आराखडा लागू केला. त्यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम’ हा विषय लागू केला आहे. प्रत्येक विषयासाठी परिषदेने संदर्भ पुस्तके आणि ग्रंथांची यादी दिली आहे. त्यामध्ये ‘इसेन्स ऑफ इंडियन नॉलेज ट्रॅडिशन’ या विषयासाठी ‘भारतीय विद्या सार’ हे पुस्तक लागू करण्यात आलेले आहे. भारतीय विद्याभवन यांनी या विषयाच्या आराखडा तयार केला असून या संस्थेनेच पुस्तकाचे प्रकाशन केले आहे.

या पुस्तकावरून आता नवा वाद सुरू झाला आहे.

हे पुस्तक मागे घेण्याच्या मागणीसाठी अभ्यासकांनी ऑनलाइन याचिका सुरू केली आहे. याबाबत ही ऑनलाइन याचिका सुरू करणारे होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन संस्थेचे अनिकेत सुळे यांनी सांगितले, ‘भारतात खगोलशास्त्र, गणित यांमध्ये उत्तम काम झाले आहे. ते पुढील पिढीला सांगितलेच पाहिजे. मात्र, ज्या दाव्यांचे ठोस पुरावे नाहीत अशा गोष्टी मुलांना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून सांगणे चुकीचे आहे. त्यामुळे हे पुस्तक लागू करण्यात येऊ नये.’ याबाबत परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पुस्तक मागे घेण्याची अभ्यासकांची मागणी

‘अगस्ती ऋषींनी पाण्यातील ऑक्सिजन आणि हायड्रोजनच्या उपघटनाचा शोध लावला. न्यूटनच्या गतीच्या नियमांचा शोध कणाद ऋषींनी आधीच लावला होता. वैमानिक शास्त्र भारतात आधीच विकसित झाले होते. ऋग्वेदात गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला होता.’ अशा प्रकारची विधाने या पुस्तकांत करण्यात आली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. हे पुस्तक मागे घेण्यात यावे अशी मागणी अभ्यासकांकडून करण्यात येत आहे. पुस्तकात अतार्किक विधाने करण्यात आी असल्याचा आक्षेप संशोधकांकडून घेण्यात आला आहे.