ठाणे-पनवेल लोकलमध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या तुषार जाधव या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या हत्याप्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. तुषारची हत्या ज्या डब्यात झाली त्या डब्यात मानससरोवर स्थानकात दोन तरुण चढतानाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून चोरीच्या उद्देशाने त्यांनी तुषारची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.
रत्नागिरीतील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारा तुषार कोकणकन्या एक्स्प्रेसने पनवेल येथे उतरून ट्रान्सहार्बर लोकलने ऐरोली येथील आपल्या घराकडे निघाला होता. मात्र, घणसोली स्थानकाच्या आधी त्याची गळा चिरून हत्या करण्यात आली. तुषारच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आलेल्या रेल्वे हवालदार मोडक यांना डब्यात अन्य कोणीही न दिसल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. पोलिसांनी पनवेल ते घणसोली स्थानकादरम्यानचे रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता वीस ते पंचवीस वयोगटातील दोघे जण मानससरोवर स्थानकातून तुषार बसलेल्या डब्यात चढल्याचे आढळले. घणसोली स्थानकातील फुटेजनुसार लोकल स्थानकात दाखल होत असताना हे दोघे उडी मारून पळ काढताना आढळले आहे. चोरीच्या उद्देशाने डब्ब्यात दाखल झालेल्या या तरुणांना तुषारने प्रतिकार केल्यानंतर त्यांनी त्याची हत्या केली असावी, असा अंदाज आहे.
नेत्ररूपी जीवनदान
नियतीने वाढून ठेवलेले दु:ख बाजूला करत कुटुंबियांनी तुषारचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील सहियारा या नेत्रपेढीत तुषारचे डोळे दान करण्यात आल्याची माहिती त्याचे वडील अरुण जाधव यांनी दिली आहे. किमान डोळय़ांच्या माध्यमातून तरी तुषारला पाहता येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.