दंडवसुलीच्या कामावर अभियंत्यांचीही नेमणूक; रस्त्यांच्या डागडुजीसाठी मनुष्यबळ अपुरे

रस्त्यांवर बेकायदा वाहने उभी करणाऱ्यांवर दंडाचा दंडुका उगारण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची मोठी फौज रस्त्यावर उतरवली आहे. यामुळे एकीकडे ही मोहीम भलतीच प्रभावी ठरत असतानाच, त्यामुळे अन्य विभागांची कामे मात्र रखडली आहेत. विशेष म्हणजे, पावसाळय़ात रस्त्यांवर खड्डे पडण्याचे प्रमाण वाढले असतानाही पालिकेचे अभियंते आणि विभाग कार्यालयांतील कर्मचारीही पार्किंगविरोधी मोहिमेस जुंपले आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या डागडुजीची कामेही रखडली आहेत.

सार्वजनिक वाहनतळांच्या परिसरात ५०० मीटपर्यंत गाडय़ा उभ्या करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा पालिका प्रशासनाने ७ जुलैपासून कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत वाहनचालकांकडून दंड गोळा करणे, गाडय़ा टोचन करून नेणे अशा स्वरूपाची कारवाई केली जात आहे. सध्या संपूर्ण मुंबईत केवळ २३ सार्वजनिक वाहनतळांच्या परिसरात ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे काही ठरावीक वॉर्डापुरती ही मर्यादित आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी वॉर्डामधील अभियंत्यांना कामाला जुंपले आहे. देखभाल विभागातील अभियंते आणि कर्मचारी या कामासाठी जुंपल्यामुळे वॉर्डातील कामे रखडली आहेत. सध्या ही कारवाई मलबार हिल, नेपियन्सी रोड, बांद्रा, लोअर परेल, कुर्ला, गोरेगाव, सांताक्रूझ, नाहूर, शिवडी, मुलुंड, कांजूरमार्ग, अंधेरी, बोरिवली, विक्रोळी अशा ठिकाणी ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे जी दक्षिण, डी वॉर्ड, एच पूर्व, एच पश्चिम, एल, पी दक्षिण, एस, एफ दक्षिण, टी, के पश्चिम, आर उत्तर या ११ वॉर्डातील कामे रखडणार आहेत. या कामासाठी देखभाल विभागातील अभियंते व कर्मचारी यांनाही नेमण्यात आले आहे. सहाय्यक अभियंत्यांपासून ते कनिष्ठ अभियंत्यांना या कामाला लावले आहे.

सध्या वॉर्डच्या कर्मचाऱ्यांकडे आधीच खूप काम आहे. त्यातच या कारवाईचा ताण या अभियंते आणि कर्मचाऱ्यांवर वाढत आहे. रस्ते विभागातील वॉर्डातील अभियंते सध्या खड्डे बुजवण्यापेक्षा पार्किंगविरोधातील कारवाईच्या कामाला जुंपले आहेत, त्यामुळे वॉर्डातील कामे रखडली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अनधिकृत बांधकामाविरोधातील कारवाई देखील रखडणार आहे. येत्या काळात ही कारवाई विस्तृत केल्यास कामांवर खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नगरसेवक निधीतील कामेही ठप्प?

नगरसेवक निधीचा वापर करून जी कामे वॉर्डात केली जातात, ती सगळीच या आता रखडण्याची शक्यता आहे. आधीच लोकसभेच्या आचारसंहितेमुळे वॉर्डातील कामे रखडली होती. आता या कामांची अंदाजपत्रके बनवणे, निविदा प्रक्रिया करून, प्रभाग समित्यांमध्ये कामे मंजूर करणे, प्रत्यक्ष कामे हे सारेच रखडणार आहे. पालिकेत  एकूण अभियंत्यांची ४,४८२ पदापैकी ३,५१३ पदे कार्यरत आहेत तर ९६९ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारात पुढे आले होते. त्यामुळे अभियंत्यांवरील कामाचा ताण आणखी वाढला आहे.

पार्किंग कारवाईविरोधात तीव्र असंतोष

५०० मीटर परिसरात बेकायदा उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनचालकांकडून जबर दंड वसूल करण्याच्या मुंबई महापालिकेच्या निर्णयावर शहरातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही रहिवाशांनी या दंडवसुलीविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. तर काहींनी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.