मुंबईत सागरी मार्ग तसेच अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावांना महाराष्ट्र सागरी किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने शुक्रवारी मान्यता दिल्याने या दोन्ही प्रकल्पांमधील मुख्य अडसर दूर झाला आहे. दोन्ही प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, दिल्लीच्या मंजुरीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करता येईल.
वांद्रे-वरळी सागरी मार्गाचा हाजी अलीपर्यंत विस्तार करण्याची योजना होती, पण त्याऐवजी सागरी मार्ग बांधण्याची कल्पना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली होती. टोलचा भरुदड पडणार नाही, तसेच कमी खर्चात हे काम होईल हा त्यामागचा उद्देश होता. केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने प्रस्तावित सागरी मार्गाला काही आक्षेप घेतले होते. यानुसार सागरी मार्गाच्या आराखडय़ात मुंबई महानगरपालिकेने बदल केले. मुंबईत सागरी मार्ग बांधण्याकरिता सुधारित आराखडय़ास पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने सुचविल्यानुसार पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून आराखडय़ात काही बदल करण्यात आले. हाजी अलीपासून समुद्राच्या किनारी हा नवा मार्ग बांधण्यात येणार आहे. या मार्गामुळे दक्षिण मुंबईतील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल.
प्राधिकरणाने मंजुरी दिल्याने आता सागरी मार्गाचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याकडे अंतिम मंजुरीसाठी जाणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सागरी मार्गाला मंजुरी देण्याचे सूतोवाच यापूर्वीच केले आहे. यूपीए सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी सागरी मार्गाचा प्रस्ताव अडवून ठेवला होता.
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काही तांत्रिक बाबींमुळे मान्यता मिळण्यात अडचणी येत होत्या. या साऱ्या तांत्रिक बाबी दूर करण्यात आल्या आहेत. पुतळ्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीकरिता केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार
आहे.