वेगवेगळय़ा प्रकारांतील फलकांसाठीही समान शुल्क आकारण्याचा निर्णय

शहरातील जागेनुसार घरांपासून भाज्यांपर्यंतचे भाव ठरतात, मात्र महानगरपालिका नव्याने आणू पाहत असलेल्या होर्डिग धोरणात मात्र कुलाब्यापासून मुलुंड बोरिवलीपर्यंत सर्वत्र होर्डिगना एकसमान दर ठेवण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे. साधे, प्रकाशित आणि अगदी डिजिटल होर्डिगनाही एकसमान दर ठेवले जाणार असून केवळ आकारानुसार दरात फरक पडेल.

महानगरपालिकेने २००८ मध्ये रस्त्यांवरील फलकांबाबत धोरण तयार केले होते. मात्र त्यात गल्लीबोळातील वाढदिवसांच्या भित्तिपत्रक, नाक्यावरील सूचनाफलक इ. विचार करण्यात आला नव्हता. जागोजागी लावलेल्या, शहर विद्रूप करणाऱ्या जाहिरात फलकांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे आता सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे काम सुरू आहे. यात साध्या जाहिरातफलकांसोबत आधुनिक डिजिटल फलकांबाबत प्रशासनाकडून विचार केला जात आहे, त्याचप्रमाणे सर्व जाहिरात फलकांसाठी प्रति चौरस मीटरनुसार दर लावले जाणार असून दक्षिण मुंबई व उपनगरांमध्ये समान दर असतील. रस्त्यावरची जाहिरात प्रत्येकाकडून पाहिली जाते. दक्षिण मुंबईत जास्त ग्राहक व उपनगरात कमी, असा प्रकार नसतो. उलट उपनगरातील लोकसंख्या जास्त वाढली आहे. त्यामुळे सर्व शहरात जाहिरातींचे एकसमान दर ठेवण्याबाबत विचार सुरू आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पूर्वीच्या धोरणानुसार शहराला तीन भागात विभागण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जाहिरातींचा दरही दोन प्रकारे लावला जातो. काही वेळा रस्त्याच्या एका बाजूला जास्त दर व दुसऱ्या बाजूला कमी दर असतो व त्यामुळे एकाच बाजूला जाहिरातींची दाटी दिसते. त्याचप्रमाणे साध्या जाहिरातींचे दर भरून प्रकाशित जाहिराती लावण्याचेही उद्योग सुरू राहतात. एकसमान दर केल्यास हे प्रकार बंद होतील, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.  एका रस्त्यावर शक्यतो एकाच आकाराचे फलक लावायला परवानगी धोरण तयार झाल्यावर मुंबईकरांकडून सूचना व हरकती मागवल्या जातील. महापालिकेनंतर त्याला राज्य सरकारकडूनही मान्यता लागेल.

डिजिटल फलकांची तयार मांडणी

शहरातील वाहनांचा सरासरी वेग १२ किलोमीटर आहे. त्याचप्रमाणे काही रस्त्यांवर अधिक वेगाने वाहने जातात. पण वाहतूक पोलिसांच्या सूचनांनुसार होर्डिगच्या जागा व आकार ठरवता येतील. त्यामुळे हे फलक अपघातासाठी कारणीभूत ठरणार नाहीत. जगभरात मोठय़ा शहरांमध्ये आता याप्रकारे फलक लावले जातात. डिजिटल फलक लावण्यासाठी एकदाच खर्च करावा लागेल व त्यावर अनेक जाहिराती एकापाठोपाठ बदलता येतील, तसेच आपत्कालीन स्थितीत महापालिकेच्या सूचनाही सुरू करता येतील.