देशभरासह राज्यात करोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. एकीकडे दररोज लाखांच्या संख्येत करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ सुरू आहे. अनेक ठिकाणी रूग्णांलयांमध्ये आरोग्य सुविधांसह लस तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे १ मे पासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्प्याल सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १८ ते ४४ वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला आहे. मात्र, लशींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १ मेपासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. लशींचा पुरेसा साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण सुरू करण्यात येणार असून, सहव्याधी असलेल्यांना प्राधान्य वा वयोमानानुसार टप्पे तयार करण्याची सरकारची योजना आहे. या पार्श्वभूमीवरच आज  मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना काहीसा दिलासा देणारी माहिती दिली आहे.

“मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, कृपया लसीकरण केंद्रांवर गर्दीत किंवा लांब रांगेत उभा राहू नका. केवळ आतासाठी लसींचा अल्प पुरवठा होत आहे आणि त्यामुळे सर्व ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. पण खात्री बाळगा ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण होईल.” असं  अश्विनी भिडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना आश्वस्त केलं आहे.

“मुंबईत पुढचे ३ दिवस लसीकरण बंद राहणार”, अतिरिक्त आयुक्तांची माहिती!

तसेच, “एवढंच नाही तर जेव्हा १८ ते ४४ वयोगटातील लोकांसाठीचा लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू होईल. आता उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्र ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी सक्रीय असतील. बीएमसीकडून लसीकरणाच्या नव्या टप्प्यासाठी आणखी ५०० सार्वजनिक आणि खासगी लसीकरण केंद्र वाढवली जातील. जेणेकरून ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठाची लसीकरण मोहीमेशी कुठलीही तडजोड करावी लागणार नाही व तिचा वेग देखील मंदावणार नाही.” असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

लस मोफत, पण विलंबाने!

“दुसरीकडे, नव्या वयोगटासाठीचे लसीकरण हे केवळ लस मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यावरच सुरू होईल आणि बरोबर १ मे रोजीच सुरू होईल असं नाही. त्यामुळे लसीकरणाचा नवा टप्पा सुरू झाल्यानंतर आपण लसीकरणापासून वंचित राहू, असा विचार करून ज्येष्ठ नागरिकांनी काळजी करण्याची गरज नाही.” असं अश्विनी भिडे म्हणाल्या आहेत.

लसींच्या किंमतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय

“ज्यांनी आपला पहिला डोस घेतलेला आहे ते योग्यप्रकारे संरक्षित आहेत. त्यामुळे दुसरा डोस घ्यायला जरासा उशीर जरी झाला तरी फार मोठी अडचण नाही. ज्येष्ठ नागरिकांनी यामुळे घाबरू नये.” असं सांगून,  “कृपया आमच्याकडे पुरेसा लस साठा येईपर्यंत वाट पाहा आणि लांब रांगेत न उभा राहता तुम्हाला तुमचा लसीचा डोस मिळू शकतो. आम्ही अधिक तपशील देत राहू. काळजी घ्या, लसीकरण केंद्रावर दोन मास्क वापरा.” असा सल्ला देखील त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना दिली आहे.