उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीची चिठ्ठी ठेवलेली गाडी बेवारस सोडताना परिधान केलेले कपडे आरोपी सचिन वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळून नष्ट केले, असा दावा गुरुवारी ‘एनआयए’ने केला. वाझे यांनी वापरलेल्या आणखी दोन महागड्या गाड्याही या पथकाने जप्त केल्या.

अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारीच्या रात्री बेवारस सापडलेल्या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हा गाडीही होती. या गाडीतून एक व्यक्ती उतरली, स्कॉर्पिओची पाहणी करून ती निघून गेल्याचे परिसरातील सीसीटीव्ही चित्रणावरून स्पष्ट झाले. ही व्यक्ती म्हणजे वाझेच होते, असा दावा ‘एनआयए’ने केला. त्या वेळी परिधान केलेले कपडे वाझे यांनी मुलुंड परिसरात जाळले. पुरावा सापडू नये, या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले, असा दावा ‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने केला.

गाड्या जप्त

‘एनआयए’ पथकाने वाझे वास्तव्यास असलेल्या ठाण्यातील गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीखालून ‘लँड क्रूझर प्राडो’ गाडी जप्त केली. याच गाडीतून वाझे यांनी व्यावसायिक मनसुख हिरेन यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी नेले होते. अंबानी यांच्या निवासस्थानी बेवारस सोडलेली स्कॉर्पिओ तीन वर्षे मनसुख यांच्या ताब्यात होती. ती चोरी झाल्याची तक्रार त्यांनी १७ फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्यात दिली. प्रत्यक्षात ती गाडी चोरी झालीच नव्हती. ती वाझे यांच्या निवासस्थानी १७ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत दडवून ठेवण्यात आली, असा संशय ‘एनआयए’ला आहे. वाझे वापरत असलेली अन्य एक मर्सिडीज गाडीही ‘एनआयए’ने जप्त केली. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच गाड्या ‘एनआयए’च्या ताब्यात आहेत. पथक आणखी दोन गाड्यांचा शोध घेत आहेत.

सीसीटीव्ही चित्रणाचा तपास सुरू

‘एनआयए’च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वाझे यांनी तपासाच्या निमित्ताने स्वत:च्याच इमारतीतील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. याशिवाय या संपूर्ण प्रकरणात वाहनांच्या अनेक बनावट नोंदणी क्रमांक पाट्या तयार करून घेण्यात आल्या. त्या प्रत्येक ठिकाणचे चित्रणही वाझे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. या चित्रणात वाझे यांनी फेरफार केला का, याचाही तपास सुरू आहे.

तपास साहाय्यक निरीक्षकाकडे?

वाझे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनंतर एनआयए पथक मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करू शकतात. देशातील आघाडीच्या व्यावसायिकाला मिळालेल्या धमकीचा तपास साहाय्यक निरीक्षकाकडे कसा? हा प्रशद्ब्रा या अधिकाऱ्यांना केला जाऊ शकतो.

तारांकित हॉटेलमध्ये खोल्या?

दक्षिण मुंबईतील चार हॉटेलमध्ये सचिन वाझे यांनी मोठ्या कालावधीसाठी एक खोली आरक्षित करून ठेवली होती, अशी माहिती एनआयएला तपासादरम्यान मिळाली आहे. या माहितीची खातरजमा सुरू असल्याचे समजते. या माहितीत तथ्य आढळल्यास असे करण्यामागील हेतूबाबत वाझे यांच्याकडे चौकशी होऊ शकते.

शवचिकित्सा करणाऱ्या तज्ज्ञांची ‘एटीएस’कडून चौकशी

बुधवारी ‘एटीएस’ने व्यावसायिक मनसुख हिरेन यांची शवचिकित्सा करणाऱ्या तीन तज्ज्ञांची चौकशी केली. प्राथमिक अहवालात मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकण्यात आला असे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. मृत्यूपूर्वी मनसुख यांच्या शरीरावर जखमा, व्रण आढळले होते. मनसुख यांची हत्या करण्यात आली या निरीक्षणास आधार मिळावा या हेतूने एटीएसने ‘डायटम’ चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आणि शवचिकित्सेतून पुढे आलेले प्राथमिक निरीक्षण यात किंचित विरोधाभास आढळला. मनसुख पाण्यात पडले तेव्हा ते जिवंत किंवा बेशुद्धावस्थेत होते, असे निरीक्षण या चाचणीतून पुढे आले. हा अहवाल एटीएस हरियाणा येथील प्रयोगशाळेत अभिप्रायासाठी पाठवणार आहे. या वृत्तास एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला.

वकिलांशी स्वतंत्र भेटीसाठी विशेष न्यायालयात अर्ज

उद्योगपती मुके श अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके  ठेवल्याच्या आरोपप्रकरणी अटके त असलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी वकिलांच्या स्वतंत्र भेटीसाठी विशेष न्यायालयात अर्ज के ला आहे. विशेष न्यायालयानेही या अर्जावर राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीच्या वेळी वाझे यांच्यासोबत त्यांचे वकीलही हजर राहू शकतील, असे विशेष न्यायालयाने याआधीच स्पष्ट के ले आहे. मात्र वकिलांशी स्वतंत्र भेट घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी वाझे यांनी केली आहे. न्यायालयाने वाझे यांच्या अर्जावर एनआयएला शुक्रवारी उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.

पोलीस दलात फेरबदलाचे संकेत

वाझे यांना अटक केल्यानंतर या प्रकरणात पोलीस दलातील काही आजी-माजी अधिकाऱ्यांचा सहभाग असावा, असा संशय एनआयएने व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाच्या पाश्र्वाभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि दोन सहआयुक्तांकडे चौकशी केली. या वेळी पोलीस दलातील काही अधिकारी विभागप्रमुखांना विश्वाासात न घेता थेट आयुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधत होते, अशी तक्रार पुढे आल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून समजते. वाझे प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये, पोलीस अधिकारी बेबंद होऊ नयेत या दृष्टीने बेशिस्त अशा अधिकाऱ्यांबाबत माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलीस आयुक्तालयातून मिळत आहेत.