मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीचे औचित्य साधून मुंबईसह उपनगरातील अनेक मंडळांनी गुरुवारी गणेशमूर्ती आगमनाचा बेत आखला. त्यामुळे परळ, लालबाग, दादर या परिसरांत मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळाला.

उपनगरातील कुल्र्याचा महाराजा, खैरणीचा राजा आणि कन्नमवार नगरचा सुखकर्ता या गणेशमूर्तीचे गुरुवारी लालबाग-परळमधील कार्यशाळांमधून मंडपाकडे प्रस्थान झाले. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यात घडलेल्या गैरप्रकारानंतर या वेळी पोलिसांनी सुरक्षा आणि वाहतुकीच्या दृष्टीने अधिकच सतर्कता बाळगली होती. पोलिसांनी गणेश मंडळांशी आणि मूर्तिकारांशी समन्वय साधून उपनगरातील अनेक आगमन मिरवणुकांना दुपारी दोनच्या सुमारासच दादरकडे रवाना केले. त्यामुळे भायखळा ते दादर या मुख्य रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टळली. इतर मंडळांनी आपल्या विभागात आगमन सोहळा आयोजित केला होता. त्यामुळे परळ विभाग नेहमीचा गोंगाट नव्हता. आगमन सोहळ्यांना मिळणारी प्रसिद्धीमुळे अनेक मंडळ आगमन सोहळ्याचा घाट घालताना दिसत आहेत.

पारंपरिक आगमन सोहळा

पारंपरिक आगमन सोहळ्यासाठी चर्चेत असलेल्या ‘काळाचौकी महागणपती’ या गणेशमूर्तीचे लालबाग नगरीत दिमाखात स्वागत झाले. चिंचपोकळी पूल धोकादायक असल्याची दखल घेत मंडळाने गणेश टॉकीज येथून आगमन सोहळ्याला सुरुवात के ली. महागणपतीची मूर्ती यंदा विठ्ठल रूपात साकारली असून आगमन सोहळ्यात बॅन्जो आणि ढोल पथकांसह दिंडी, आदिवासी नृत्य, कोकणातील पालखी नृत्य, लेझीम आदी महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणाऱ्या लोककला प्रकारांचे सादरीकरण करण्यात आले.