“खोटा आरोप करून केंद्र सरकारबद्दल असंतोष निर्माण केल्याबद्दल आणि अफवा पसरविल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांची राज्य मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा व संसर्गजन्य कायद्याअंतर्गत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा,” अशी मागणी आज (सोमवार) भाजपाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून केली. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व आमदार कॅप्टन सेल्वम यांनी आज या संदर्भात राज्यपालांची भेट घेतली.

ठाकरे सरकारचे अल्पसंख्याक मंत्री यांनी रेमडेसिवीरबाबत खोटी माहिती पसरवून जनतेत घबराट निर्माण केली. “करोनामुळे पिचलेल्या जनतेला भयभीत केल्याप्रकरणी मलिक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही आज राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.” अशी माहिती भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजपा नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, “राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोप केला होता, तेव्हाच मी त्यांना आवाहन दिलं होतं की तुम्ही याचे दोन दिवसात पुरावे सादर करा, परंतु त्यांनी पुरावे सादर केले नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारच्या विषयी नाराजी लोकांच्या मनात खोटे आरोप करून निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर याच्यामुळे लोकांच्या मनात भयाचं वातावरण झालं. मुंबई सोडण्यासाठी लोकांनी रेल्वेस्थानकांवर गर्दी केली. त्यामुळे साथीच्या रोगाच्या कायद्याचा भंग झालेला आहे. या दोन्ही कलमाखाली त्यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करावा, जर राज्य सरकार एफआयआर दाखल करत नसेल, तर राज्यपालांनी आपल्या अधिकारांचा वापर करून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, या मागणीसाठी आम्ही आज राज्यपालांना भेटलो होतो.”

तसेच, “मला पूर्ण विश्वास आहे की राज्यपाल यावर कारवाई करतील आणि जर या संदर्भातील एफआयआर झाला नाही, तर आम्हाला न्यायालयात जाण्याचा मार्ग उपलब्ध असतो. तो न्यायालयाचा मार्ग आम्ही निवडू, असं देखील भातखळकर म्हणाले.