मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी महत्त्वाची साक्ष देणारी आणि कसाबची ओळख पटवणारी देविका रोटावन (२१) हिने नुकसानभरपाईच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिनिधींनी आपल्या घरी येऊन भेटी दिल्या आणि आर्थिकदृष्टय़ा मागास वर्गातून घर उपलब्ध करून देण्याचे, आपल्या शिक्षणासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी आवश्यक ते साहाय्य करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने आपल्याला जी आर्थिक मदत केली ती आपल्या उपचारांवर खर्च झाली, असे देविकाने याचिकेत म्हटले आहे. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपैकी जिवंत दहशतवाद्याची न्यायालयात निडरपणे ओळख पटवून आणि आपली साक्ष न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा सुनावताना महत्त्वपूर्ण मानूनही सरकारने आपल्याला म्हणावे तसे सहकार्य केलेले नाही. आश्वासित केलेल्या गोष्टींच्या पूर्ततेसाठी आपण आणि आपल्या कुटुंबीयाने सरकार दरबारी अनेक याचना केल्या, परंतु काहीच झाले नाही, असा दावा तिने केला आहे.

वांद्रेमधील चाळीतील भाडय़ाच्या घराचे भाडे देण्यास पैसे नाहीत. परिणामी, आपण  आपल्या कुटुंबासमवेत अत्यंत दुरवस्थेत राहत आहोत. कोणत्याही क्षणी डोक्यावरचे छत हिरावले जाऊ शकते. त्यामुळे घर उपलब्ध करण्याचे आणि आपल्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी मदत करण्याचे आदेश सरकारला द्यावेत, अशी मागणी देविकाने केली आहे.

वडील आणि भाऊ अन्य आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळे ते कमावू शकत नाही. परिणामी, घराचे महिन्याचे भाडेही देणेही शक्य नाही. आपण चेतना महाविद्यालयातून शिक्षण घेत असून पुढे नागरी सेवेत भवितव्य घडवण्याची इच्छा असल्याचे देविकाने म्हटले आहे.

मुंबईवरील हल्ल्याच्या वेळी देविका नऊ वर्षांची होती. ती आपल्या कुटुंबीयांसोबत पुण्याला जात होती. त्यावेळी कसाबने सीएसएमटी स्थानकात केलेल्या अंधाधुंद गोळीबारात देविकाच्या उजव्या पायाच्या मांडीला गोळी लागली होती. तिच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार करण्यात आले. तेथे तिच्या पायावर महिनाभरात सहा शस्त्रक्रिया करण्यात आल्या.