मॉल, सिनेमागृह, हॉटेल्स इत्यादींसह व्यावसायिक इमारतींमध्ये अपंगांना विनाअडथळा वावर करता यावा यासाठी या इमारती अपंगस्नेही करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र असे असतानाही या इमारती अपंगस्नेही केल्याची धूळफेक केली जात असल्याची बाब सोमवारी उच्च न्यायालयातील सुनावणीच्या वेळी उघड झाली आणि न्यायालयाने त्याचा खरपूस समाचार घेतला.

नरिमन पॉइंट येथील तुलसियानी चेंबरच्या प्रवेशद्वाराजवळ तात्पुरता रॅम्प उभा करण्यात आला असला तरी व्हीलचेअरवरील व्यक्ती आधाराशिवाय या रॅम्पचा वापरच करू शकत नाही, तर दुसरीकडे नरिमन पॉइंट येथील आयनॉक्स सिनेमागृहातील रॅम्प हा रॅम्प नव्हे, तर पायऱ्या असल्याचा भास होतो हे न्यायालयात सादर छायाचित्रातून स्पष्ट झाले; परंतु सर्जनशीलता म्हणून या रॅम्पला तसा प्रभाव देण्यात आल्याचे सांगण्यात आल्यावर नको तिथे कल्पनाविष्कार हवा कशाला? अशा कडक शब्दांत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने या अतिसर्जनशीलता आणि धूळफेकीवर ताशेरे ओढले.

मुंबईतील बहुतांश महत्त्वाच्या इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा उपलब्ध नसतात. परिणामी या इमारतींमध्ये जाण्यासाठी अपंगांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, ही बाब निशा जामवाल आणि अ‍ॅड्. आभा सिंह यांनी जनहित याचिकेद्वारे न्यायालयासमोर आणली आहे. तसेच या इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश द्या, अशी मागणी केली आहे. अपंगस्नेही नसलेल्या दक्षिण मुंबईतील १५ व्यावसायिक इमारतींची यादीही त्यांनी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर केली होती. या याचिकेची दखल घेत व्यावसायिक इमारती या अपंगस्नेही असल्याच पाहिजेत, असे स्पष्ट करत मुंबईत उभ्या राहणाऱ्या व्यावसायिक इमारतींमध्ये अपंगांसाठीच्या सुविधा आहेत की नाहीत याची खात्री पटल्यानंतरच अशा इमारतींना अधिवास दाखला देण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले होते. तसेच याचिकाकर्त्यांने सूचित केलेल्या १५ इमारतींची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली असता पालिकेने आपला अहवाल सादर केला. त्यात कायमस्वरूपी वा तात्पुरती सोय म्हणून उभारलेल्या रॅम्पची छायाचित्रे आहेत. अपंगांना सहज, कुठल्याही आधाराशिवाय वावर करता येईल यासाठी व्यावसायिक इमारती अपंगस्नेही असणे गरजेचे आहे. तिथे धूळफेक वा अतिसर्जनशीलता नको, असे न्यायालयाने सुनावले. पालिकेने पाहणी केलेल्या इमारती खरेच अपंगस्नेही आहेत काय, हे याचिकाकर्त्यांनी तपासावे, असेही सांगितले आहे.

सुविधा कुठे आहेत, कुठे नाहीत?

नरिमन पॉइंट येथील आयनॉक्स सीआर-२ सिनेमागृह, ओबेरॉय हॉटेल, तुलसियानी चेंबर, हॉटेल फोर सीझन, लोअर परळ येथील पेनिन्सुला बिझनेस पार्क, स्टर्लिग सिनेप्लेक्स, फोर्ट येथील सीबीआय कार्यालय, वरळी येथील आयनॉक्स अ‍ॅट्रिया इत्यादी ठिकाणी रॅम्प आहेत, तर रिगल सिनेमागृह, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नेहरू तारांगण येथील जेड गार्डन आणि कमला मिलमधील तमाशा येथे रॅम्प वा अपंगस्नेही शौचालयाची सुविधा नाही.